पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत सरकारने न्यायालयात फेरयाचिका दाखल करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

पर्यावरण विभागाने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. यामुळे 13 हजार मूर्तिकार आणि त्यांच्या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सरकारने न्यायालयात फेर याचिका दाखल करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज 289 अनव्ये प्रस्तावावर बोलताना सभागृहात केली. तसेच यासाठी अभ्यास समिती गठीत करून ते सिद्ध होईपर्यंत कारवाई करू नये, अशी विनंतीही दानवे यांनी सरकारला केली.
मुंबईत गणेश जयंतीवेळी गणेशमुर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी पर्यावरण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या भूमिका या परस्पर विरोधी आहेत. याबाबत गणेश भक्तांच्या भावना तीव्र आहेत आणि रोजगारही महत्त्वाचा आहे. यावर चर्चा व्हावी आणि सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही दानवे यांनी लावून धरली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. सरकारने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात हीच भूमिका घेतली आहे. पीओपीवर बंदी घालण्याची भूमिका ही सरकारने नव्हे तर प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घातली आहे, असेही ते म्हणाले.
याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली असून यावर काही तांत्रिक मार्ग काढून प्रदूषण कमी करता येईल का याबाबत विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Comments are closed.