एक मंत्री म्हणतो सातबारा करू कोरा, दुसरा म्हणतो पैसे भरा, हे लबाडांचे सरकार! अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

आपली ही सभा भर पावसात सुरू आहे. मला वाटत नाही पाऊस कितीही जोरात आला तरी मैदानावरचा एकही माणूस हालणार नाही. उलट्या खुर्च्या वाढत जातील एकही कमी होणार नाही. कारण ही शिवसेनेची सभा आहे XXX लोकांची किंवा गद्दारांची सभा नाहीये, अशी सडकून टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यात केली.
महाराष्ट्रात आताच्या घडीला ३३ जिल्ह्यांमध्ये हाहाःकार उडालेला आहे. सर्वसामान्य शेतकरी, सामान्य माणूस अतिशय दुःखात, कष्टात आणि वेदनेत आहे. आणि असं असताना या महाराष्ट्रातलं सरकार झोपलेलं आहे की जागं आहे? या सरकारला जनतेच्या वेदना दिसतात की नाही दिसतात? या सरकारला कान आहे की नाही? वेदना ऐकू येताक की नाही? या सरकारला डोळे आहे की नाही? व्यथा दिसतात की नाही दिसत? या सगळ्यावर बोलायला यांच्याकडे तोंड आहे की नाहीये? अशी स्थिती आताच्या सरकारची आहे, अशी खरमरीत टीका अंबादास दानवे यांनी केली.
महाराष्ट्रात मागच्या महिना दीड महिन्यात अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे. जवळपास ६० लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. लाखो शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय. ठिकठिकाणी आंदोलनं उभी राहताहेत. ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार नुसत्या घोषणेमध्ये बसलेलं आहे. घोषणे शिवाय हे सरकार काही करत नाही, अशी स्थिती आहे. देशात शेतकऱ्यांच्या जेवढ्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यात ३९ टक्के आत्महत्या या महाराष्ट्रात झालेल्या आहेत, या महाराष्ट्राच्या सरकारला लाज वाटली पाहिजे. हे करंट सरकार आलं १ जुलै २०२३ पासून ते आतपार्यंत जून २०२५ पर्यंत महाराष्ट्रात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असे अंबादास दानवे म्हणाले.
एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात सातबारा कोरा कोरा… अजितदादा म्हणतात ३० तारखेपर्यंत पैसे भरा. असं हे लबाड सरकार आहे. आजचं हे राज्यातलं सरकार महिषासुराचा अवतार आहे. महिषासुराच्या अवताराला शिवसेना रुपी आई भावानीची तलवार निश्चित नेस्तनाबूत करण्यासाठी आपण संकल्प करावा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले.
Comments are closed.