अजित दादांची शिस्त ही माज दाखवणाऱ्यांना ‘समज’ देण्यापूर्तीच आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या घटनेला 12 तास उलटल्यानंतरही मारहाण करणारा अजित पवार गटाचा कार्यकर्ता सूरज चव्हाण याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

”सत्ता आणि माज, हे आज समानार्थी शब्द होऊन बसले आहेत. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे कालची सुरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मारहाण. अजित पवार तसे शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जातात. पण ही शिस्त हा माज दाखवणाऱ्यांना ‘समज’ देण्यापूर्तीच आहे का, असा सवाल उभा राहतो. ऑनलाईन रम्मी खेळा किंवा मारहाण करा, त्यावर फक्त ‘समज’ देणे एवढेच सध्या अजितदादा करत आहेत”, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारी लातूरला आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत असताना अचानक छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी . कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी बसवा आणि पत्ते खेळायला द्या, असे म्हणत तटकरे यांच्यासमोर टेबलावर पत्ते फेकले. थोड्या वेळाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, छावाचे कार्यकर्ते बसलेल्या खोलीत आले आणि त्यांनी जोरदार मारहाण सुरू केली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याने त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.

Comments are closed.