‘मेक इन इंडिया’चं रूपांतर ‘फेक इन दावोस’ करणारी चाणक्यनिती, अंबादास दानवे यांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

स्वित्झर्लंडच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी साडेचौदा लाख कोटींचे गुंतवणूक करार केल्याचा मोठा गाजावाजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. हजारो कोस दूर दावोसला जाऊन फडणवीस यांनी करार मात्र मुंबई, महाराष्ट्रातील कंपन्यांबरोबर केले. त्यात लोढा डेव्हलपर्स, रहेजा, पंचशील आणि सुरजागड इस्पात या कंपन्यांचा समावेश आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अबंदास दानवे यांनी ट्विटरवर पोस्ट करत सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

”स्वदेशी गुंतवणूक, विदेशी पॅकेजिंग आणि दावोसचं ‘फिक्सिंग’! ​अल्ट्रा कॅपिटल, पंचशील, लोढा, रहेजा, सुरजागड इसपात या कंपन्यांची मुख्यालयं पुणे, मुंबई, गडचिरोलीत! मग यांच्याशी करार करायला स्वित्झर्लंडला जाण्याचं प्रयोजन काय? असा सवाल त्यांनी या पोस्टमधून केला.

तसेच त्यांनी या पोस्टमधून आणखी काही प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले आहेत. ते म्हणाले की, परकीय कंपन्यांचा आपल्यावर विश्वास बसत नाहीये का? की केवळ ‘आकड्यांची फुगेबाजी’ करण्यासाठी हा इव्हेंट मॅनेजमेंटचा फार्स रचला जातोय? ​स्वतःच्याच लोकांशी कागदांची देवाण-घेवाण करायला मुंबईचं ‘मंत्रालय’ कमी पडलं होतं का? ‘मेक इन इंडिया’चं रूपांतर ‘फेक इन दावोस’ मध्ये करणारी ही कोणती चाणक्यनीती? असे सवाल देखील केले आहे.

या पोस्टसोबत दानवे यांनी काही मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना टोले देखील लगावले. ”आपल्याच माणसांना विमानात बसवून न्यायचं, तिथे स्वतःच्याच लोकांशी हस्तांदोलन करायचं आणि देशी गुंतवणुकीला FDI चा खोटा मुलामा चढवायचा. ​जनतेच्या डोळ्यांत करत असलेली ही धूळफेक बंद करा! असे देखील त्यांना सत्ताधाऱ्यांना सुनावले.

Comments are closed.