फडणवीसांच्या खात्याच्या या बेफिकीरीने महाराष्ट्राला… अंबादास दानवे यांनी फटकारले
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला सहा पानी पत्र लिहून परळी औष्णिक प्रकल्पामुळे होत असलेल्या प्रदुषणाचे दाखले देत संच 6 व 8 बंद करण्यास सांगितले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खात्याच्या या बेफिकीरीने महाराष्ट्राला वीज तुटीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला लिहलेल्या पत्रातील दहा गंभीर मुद्दे अंबादास दानवे यांनी X वरील पोस्टमध्ये शेअर केले आहेत.
सदर मुद्दे खालील प्रमाणे
१. कायद्याचे उघड उल्लंघन: CPCB ने ७ मे २०१८ रोजी संच क्रमांक ६ आणि ८ बंद करण्याचे आदेश दिले होते, तरीही महाराष्ट्र ऊर्जा विभागाने हे संच बेकायदेशीरपणे सुरूच ठेवले आहेत.
२. विनापरवाना कारभार: या प्लांटचा ‘कन्सेन्ट टू ऑपरेट’ (CTO) ३१ डिसेंबर २०२४ लाच संपला आहे. परवाना नसतानाही वीज निर्मिती सुरू ठेवून प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन केले आहे.
३. विषारी हवेचा विळखा: हवेतील धुलीकणांचे (PM) प्रमाण ५० mg/Nm³ असणे अपेक्षित असताना, ते ८७ ते ९१ mg/Nm³ इतके भयानक आढळले आहे. येथील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (ESP) पूर्णपणे निकामी ठरल्या आहेत.
४. माहिती लपवण्याचा प्रयत्न: प्रदूषणाची खरी आकडेवारी समजू नये म्हणून ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीमचा (OCEMS) डेटा CPCB च्या सर्व्हरला पाठवणे डिसेंबर २०२४ पासून जाणीवपूर्वक बंद करण्यात आले आहे.
५. पाण्याचे प्रदूषण: सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जात आहे. काळेकुट्ट रसायनयुक्त पाणी स्थानिक जलस्त्रोतांमध्ये मिसळून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
६. राख वापराचा फोलपणा: राखेचा वापर (Ash Utilization) किमान ८०% होणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात तो केवळ ५५.६१% आहे. यामुळे ऊर्जा विभागावर कोट्यवधींचा दंड (Environmental Compensation) पडण्याची शक्यता आहे.
७. धोकादायक राख धरणे: २०१९ पासून ‘ॲश डायक’चे कोणतेही सुरक्षा ऑडिट झालेले नाही. जुन्या राखेच्या ढिगाऱ्यांतून बेकायदेशीर उपसा सुरू असून मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण दिले जात आहे.
८. तेल गळती आणि घातक कचरा: २०० हून अधिक तेलाचे ड्रम्स उघड्यावर ठेवल्याने जमिनीवर तेल गळती झाली आहे. घातक कचरा (ETP Sludge) राखेच्या पाण्यात मिसळला जात आहे, जे अत्यंत धोकादायक आहे.
९. कोळशाची धूळ: कोळसा उतरवताना धूळ उडू नये म्हणून बसवलेली यंत्रणा (Mist Spraying) बंद पडलेली आहे, ज्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
१०. प्रशासकीय निष्काळजीपणा: CSIR-NEERI सारख्या नामांकित संस्थेचा अहवाल असतानाही सुधारणा करण्याऐवजी ऊर्जा विभागाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
”केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमांवर बोट ठेवून वरील त्रुटी काढत ‘पारदर्शक’ कारभाराचा ढोल वाजवणाऱ्या ढोंगीना आरसा दाखवला आहे. ही बेशिस्ती केवळ हवा, पाणी बिघडवत नाही तर परळीचे सामाजिक वातावरणही बिघडवण्यास कारणीभूत ठरते आहे”, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी केली आहे.
Comments are closed.