महसूल यंत्रणा वसुली करणाऱ्या कंपन्यांची नवी आश्रयदाता बनू पाहत आहे का? अंबादास दानवे यांचा मंत्री बावनकुळेंना सवाल

राज्यात एकीकडे दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या वल्गना सुरू असतानाच, दुसरीकडे फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीने कळस गाठला आहे. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरात मायक्रो फायनान्स कंपन्या, छोट्या बँका आणि पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी धडक देत कर्जवसुलीसाठी नाहक तगादा लावल्याचे समोर आले आहे. या अमानुष प्रकारावर शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले आहे.

सरकारचे कोणतेही नियम किंवा दिलाशाची भाषा जुमानत नाही, हेच फायनान्स कंपन्यांच्या एजंटांच्या या वर्तनावरून सिद्ध होत आहे. अकोल्याच्या डोंगरगावात पैशांसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाणारे हे एजंट केवळ तगादा लावून थांबत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या घरातील लेकी-बाळींचे फोटो काढत असल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला आहे. एका बाजूला बळीराजा मानसिक तणावाखाली असताना आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत असताना, यंत्रणा झोपली आहे का, असा संतप्त सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून हल्लाबोल करताना आमदार अंबादास दानवे यांनी महसूल आणि प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेतकऱ्यांचा असा अमानवी मानसिक छळ सुरू असताना स्थानिक तलाठी, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी नेमके काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून विचारले की, तुमच्या निर्देशांना तुमचीच यंत्रणा आता केराच्या टोपलीत टाकत आहे. आता महसूल यंत्रणा या वसुली करणाऱ्या कंपन्यांची नवी आश्रयदाता बनू पाहत आहे का? सा संतप्त सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

Comments are closed.