न्यूझीलंडच्या अमेलिया केरचा दबदबा! टी-20 क्रमवारीत बनली नंबर 1 अष्टपैलू! भारतीय खेळाडू तिसऱ्या स्थानावर
न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरने (Ameliya Kerr) तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी (ICC) महिला टी-20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने 508 रेटिंग गुणांसह हे शिखर गाठले आणि वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजला मागे टाकले, जी ऑक्टोबर 2023 पासून या स्थानावर होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत अमेलियाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली. यासोबतच, कर्णधार म्हणून दोन टी-20 शतके झळकावणारी ती जगातील चौथी महिला खेळाडू ठरली आहे.
तिच्यापूर्वी चामरी अथापथ्थु, मेग लॅनिंग आणि हेली मॅथ्यूज यांनी हा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये हा कारनामा आतापर्यंत फक्त रोहित शर्मा आणि बाबर आझम यांनाच करता आला आहे.
अमेलिया पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटमध्ये सलग 11 डावांत 30 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारी पहिली खेळाडू बनली आहे. सोफी डिव्हाईनकडून कर्णधारपद स्वीकारल्यापासून तिने गोलंदाजीतही चमक दाखवली असून, 22.27 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे गोलंदाजीच्या क्रमवारीत ती 10 व्या स्थानावर पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वोलने फलंदाजीच्या क्रमवारीत मोठी झेप घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने आपल्याच संघातील बेथ मुनीला मागे टाकले. वोलने नुकतेच 52 चेंडूत शतक झळकावले, जे ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटमधील तिसरे सर्वात वेगवान शतक आहे. वोल आता वनडे आणि टी-20 अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारी चौथी सर्वात तरुण (22 वर्षे 230 दिवस) महिला खेळाडू ठरली आहे. तिने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 148 धावा करून ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताबही पटकावला.
भारतीय खेळाडूंची कामगिरी पहायचे झाल्यास, स्मृती मानधना (Smriti Mandhna) फलंदाजीच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरून तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तसेच, जेमिमा रॉड्रिग्स टॉप-10 मध्ये प्रवेश करत 10 व्या स्थानावर पोहोचली आहे. तर रेणुका सिंग गोलंदाजीच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. अरुंधती रेड्डीने गोलंदाजीमध्ये नवे स्थान पटकावले आहे आणि दीप्ती शर्मा अष्टपैलू क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
Comments are closed.