भारताच्या निर्णयावर अमेरिका समाधानी आहे
सी-हॉक देखभाल व्यवस्थेची अमेरिकेकडून प्रशंसा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताच्या नौदलाने अमेरिकेच्या ‘एमएच-60आर सी-हॉक’ हेलिकॉप्टरांची देखभाल आणि इंधन पुरवठ्याच्या व्यवस्थापनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत अमेरिकेने केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येत असताना अमेरिकेकडूनही भारताला हे शुभसंकेत मिळाले आहेत. भारतीय नौदलाने घेतलेला हा निर्णय भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सामरिक भागीदारीला अधिक बळकट करणारा आहे. भारताच्या संरक्षण विभागाने याकरिता 7 हजार 995 कोटी रुपयांच्या योजनेला संमती दिली आहे.
भारताने अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीकडून 24 बहुउद्देशीय एमएच-60आर हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा करार नुकताच केला आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने या कराराचेही स्वागत केले आहे. ही हेलिकॉप्टर्स भारताच्या नौदलाचे सामर्थ्य आणि भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता वाढविणार आहेत. भारत आणि अमेरिका, तसेच इतर विभागीय भागीदार देशांमध्ये सामरिक संपर्क बळकट करण्याच्या दृष्टीनेही हा करार महत्वाचा आहे, असे अमेरिकेच्या प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले आहे.
2020 पासून खरेदी
भारतने अमेरिकेकडून अशी 25 अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा करार केला आहे. अमेरिकेने 2020 पासून आतापर्यंत अशी 15 हेलिकॉप्टर्स भारताला दिली आहेत. 2021 मध्ये या हेलिकॉप्टर्सची प्रथम तुकडी भारतीय नौदलाच्या कोची येथील तळात स्थापन करण्यात आली होती. भारताला या कराराच्या अंतर्गत अशी आणखी 10 हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत. या हेलिकॉप्टर्सची देखभाल करण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. भारतीय नौदलाने आता ही व्यवस्था केली असून त्यामुळे सर्व 25 हेलिकॉप्टर्सचे क्रियान्वयन भारतात व्यवस्थितरित्या केले जाऊ शकणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
सी-हॉक हेलिकॉप्टर्सची वैशिष्ट्यो
हे हेलिकॉप्टर बहुउद्देशीय आहे. सागरातील शत्रूच्या हालचालींवर दूरवरुन लक्ष ठेवण्याची याची क्षमता आहे. हे एवॅक्स पद्धतीचे असून शत्रूच्या पाणबुड्यांना लक्ष्य करु शकते. समुद्री व्यापार मार्गांच्या सुरक्षेसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. हिंदी महासागर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आणि या क्षेत्रावर कोणी अतिक्रमण करु नये यासाठी त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. या हेलिकॉप्टरमध्ये मल्टीमोड समुद्री रडार असून एजीएम-114 हेलफायर क्षेपणास्त्रे त्यांच्यावर स्थापित करण्यात आली आहेत. त्याशिवाय हलक्या वजनाचे पाण सुरुंग, दूरवर मारा करणाऱ्या मशिनगन्स, अत्याधुनिक रडार यंत्रणा, विनाशिकांना संरक्षण देण्याची यंत्रणा, अत्याधुनिक इलेक्ट्रो-ऑप्टिकल टार्गेटिंग व्यवस्था, अशा अनेक सोयी यांच्यात उपलब्ध आहेत.
Comments are closed.