Iran America War – अमेरिका इराणच्या भूमीवर सैन्य उतरवण्याच्या तयारीत! खार्ग बेट आणि होर्मुझ सामुद्रधुनीजवळ छाप्यांची योजना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य-पूर्वेतील युद्ध पाचव्या आठवड्यात पोहोचले आहे. अमेरिकेकडून सातत्याने इशारे दिले जात असतानाही इराण देखील युद्धातून मागे हटायला तयार नाही. त्यामुळे आता अमेरिका एक पाऊल पुढे जात थेट इराणच्या हद्दीत सैन्य उतरवण्याची तयारी करत आहे. अद्याप याबाबत अधिकृत निर्णय झाला नसला तरी अमेरिकेने यासाठी तयारी सुरू केल्याचे समजते. याअंतर्गत खार्ग बेट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील किनारी ठिकाणांवर छापे टाकण्याचा समावेश आहे, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने शनिवारी दिले.

पोस्टने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन खार्ग बेट ताब्यात घेण्याच्या शक्यतेवर चर्चा करत आहे. या बेटावर इराणचा सर्वात मोठा तेलसाठा आहे. तसेच, गेल्या महिन्यात मध्य-पूर्वेतील युद्ध सुरू झाल्यापासून तेहरानने प्रभावीपणे रोखून धरलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इतर किनारी भागांवर छापे टाकून व्यावसायिक आणि लष्करी जहाजांना लक्ष्य करू शकणारी शस्त्रे शोधून नष्ट करण्याचाही विचार सुरू आहे.

अमेरिकन लष्कराच्या योजनांची माहिती असलेल्या एका माजी वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, त्या योजना व्यापक आहेत. “आम्ही याचा आढावा घेतला आहे. यावर युद्धाभ्यास झाला आहे. हे ऐनवेळी केलेले नियोजन नाही” असे त्या अधिकाऱ्याने ‘पोस्ट’ला सांगितले.

Comments are closed.