अमेरिकेने इराणचे आणखी एक जहाज रोखले, जगावर पुन्हा इंधन टंचाईचा धोका; नाकेबंदी हटेपर्यंत थेट चर्चा नाहीच, इराणने सुनावले
अमेरिकेने होर्मुझची नाकेबंदी केल्यामुळे इराण आणि अमेरिकेतील शांतता चर्चा फिस्कटली. त्यानंतरही अमेरिकेची गुंडगिरी सुरूच आहे. अमेरिकेने इराणचे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू होर्मुझमधून बाहेर काढत परदेशात नेणाऱया आणखी एका जहाजाला रोखून मागे फिरण्यास भाग पाडले. कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱया जहाजांना दमदाटी आणि लष्करी कारवाईची धमकी देत अमेरिकेकडून माघारी पाठवण्यात येत असल्यामुळे युद्धबंदीच्या काळातही जगावर इंधन संकटाची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे पुन्हा पाकिस्तानात दाखल झाले आहेत. ते पाकिस्तानच्या नेत्यांसोबत पुन्हा चर्चा करण्याची अपेक्षा आहे.
अमेरिकेने ‘सेवान’ या व्यापारी जहाजाला अडवून इराणकडे परत पाठवले. हे जहाज इराणचे तेल व नैसर्गिक वायू परदेशात पाठविणाऱया 19 जहाजांच्या शॅडो फ्लीटचा भाग आहे. अमेरिकेच्या ‘यूएसएस पिन्कनी’ या विनाशक जहाजाने सेवान जहाजाला अडवले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून जहाजाला निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देत जहाज माघारी फिरण्यास भाग पाडले. शनिवारीदेखील अमेरिकेने इराणचे एक जहाज रोखले होते. आतापर्यंत 37 जहाजांना माघारी पाठविल्याचा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने केला आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानात दाखल
होर्मुझच्या नाकेबंदीवरून अमेरिकेसोबत थेट चर्चा होणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन पाकिस्तानातून निघालेले इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची हे पुन्हा इस्लामाबाद येथे परतले आहेत. काल ते ओमानची राजधानी मस्कत येथे गेले होते. ते पाकिस्तानात दाखल झाल्यामुळे शांतता चर्चेला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता बळावली आहे. त्यांनी काल इराणच्या अटी पाकिस्तानकडे दिल्या होत्या. त्यावर अमेरिकेकडून मिळालेल्या प्रतिसादाबाबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे. इस्लामाबाद येथे पाकिस्तानी नेत्यांसोबत चर्चा करून ते रशियाला जाणार आहेत.
इस्रायल-लेबनॉन युद्धबंदी प्रभावहीन, हल्ले सुरूच
इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धबंदीच्या कालावधीतही दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत. सीमेलगतच्या भागांवर सातत्याने रॉकेट व हवाई हल्ले होत आहेत. यामुळे पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.
धमक्यांना घाबरून इराण चर्चा करणार नाही – राष्ट्रपती पझेश्कियान
अमेरिकेकडून टाकण्यात येणारा दबाव आणि धमक्यांना घाबरून अमेरिकेसोबत बळजबरी चर्चा करणार नाही, असे इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कियान यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांच्याशी त्यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानकडे इराणची भूमिका मांडत म्हटले की, अमेरिकेची पावले विश्वासाला तडे देत असून चर्चेचा मार्ग कठीण करत आहेत. अमेरिकेची नाकेबंदी हटविणे, हीदेखील महत्त्वाची अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘होर्मुझ’ बंद झाल्यामुळे खत टंचाईचा धोका
होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी झाल्यामुळे जगावर खत टंचाईचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास कोटय़वधी लोकांवर उपासमारीचे संकट निर्माण होण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. खतांसाठी लागणाऱया कच्च्या मालाच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या असून त्याचा परिणाम कृषी उत्पादनांवर होईल, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
Comments are closed.