अभिप्राय – आईमुलाच्या नात्याची सफर
>> अनिरुद्ध वैद्य
अमेरिका म्हणजेच फॉरिन अशी जिची समजूत आहे अशा खेडय़ात जन्मलेल्या, नऊवारी साडी नेसणाऱ्या कोल्हापुरातील अशिक्षित आईला अमेरिका वारी घडवणारा लेखक उत्तम फराकटे. प्रवासाची आवड जपणाऱया या लेखकाचे आईसोबतचे नाते प्रवासाच्या गोष्टी सांगत उलगडणारे हे पुस्तक आहे ‘अमेरिका9वारी भटकंती महासत्तेची…आईसोबतची’ 2022 साली नुकतीच कोरोना महामारी संपली असताना लिहिता, वाचता न येणाऱ्या आईला व्हिसा मिळविण्यासोबत अमेरिका फिरवून आणणे, मेट्रो विमानातून वा तत्सम प्रवास करविणे हेसुद्धा लेखकापुढे एक आव्हानच होते. प्रस्तावनेमध्ये जगतप्रवासी लेखक जयप्रकाश प्रधान लिहितात, ‘नऊवारी साडी नेसणाऱया आईला अमेरिकावारी करून आणणारा मुलगा त्या प्रवासावर एक पुस्तक लिहितो ही कल्पनाच भन्नाट. बदलत्या परिस्थितीतही आईवडिलांचे ऋण उत्तमजी विसरले नाहीत. फॉरिन कसे असते रे? असे विचारणाऱया आईलाच फॉरिनला फिरवून आणणारे उत्तम फराकटे व त्यांचे कुटुंबीय विरळाच.
भल्या भल्यांची झोप उडवणारी अमेरिका व्हिसाची मुलाखत, त्यासाठी आजीला तयार करणारी नातवंडे म्हणजे आजीसाठी दुधावरची जणू साय! लेखकाचे ओघवते लेखन वाचताना जणू आपणच प्रवास करतोय असे ते मनाला स्पर्श करते. पुस्तकाचे शीर्षकही वेगळे ठरत आहे. पंढरीच्या वारकऱयाच्या दर्शनाने धन्य होणारी माऊली जिने कोल्हापूर हे शहरच मुळी लग्नानंतर पाहिले तिच्या प्रवासाच्या कल्पनाही काशीच्या पुढे नव्हत्या.
आईच्या व्हिसाची तयारी मराठीतूनच हवा असणारा इंटरव्हय़ू, अनेक छळणारे प्रश्न अन् घरी घेतलेली कॉन्सुलेटमधील मुलाखतीची रिहर्सल, कोणताही प्रश्न विचारला की हसणारी आई, कॉन्सुलेटमधील वातावरण व ताण आई कसे निभावेल ही चिंता अपॉइंटमेंटच्या दिवशी तिच्या नऊवारीची झालेली कसून तपासणी या सगळ्यात ती मात्र एकदम ‘कूल’. हे सारं वर्णन अफलातून केले आहे.
यानंतर सुरू झाली ती आई-मुलाची वारीची पूर्वतयारी. प्रवास लांबचा व वयस्कर आई सोबत असल्याने अमेरिकेत आजारी पडणे हे चालणारच नव्हते. कुठली एअरलाइन्स, तिकीट, सलग प्रवास की टप्प्याटप्प्याने, बॅगा त्यांचे वजन, कपडे कोणते, थंडीचे काय! सगळ्यात महत्त्वाचे खाण्याचे टिकाऊ पदार्थ, कोणाकडे राहायला जमेल व आवडेल, पाहिलीच पाहिजेत अशी ठिकाणे? असा सगळा आवाका कवेत घेताना लेखकाची किती दमछाक झाली असेल असे वाटते. मात्र ही महत्त्वाची माहिती त्यांनी सहजसुंदर, वाचनीय केली आहे. जणू काही वाचक स्वतच प्रवास अनुभवतो आहे असे चपखल वर्णन लेखकाने केले आहे. या दरम्यान व्हीलचेअर असिस्टंट घेतल्याने झालेली सोय की गैरसोय? किती रे पैसे दिले त्या खुर्चीवाल्याला? उत्तर मिळाले “वीस”. “हं, मग ठीक!” (डॉलर हे मात्र उत्तमजींच्या ओठांतून पोटातच.) “इकडची लई गोरी माणसे एकंदरीत बरी वागतात व सज्जन आहेत.” हे आईचे बोल आतापर्यंतच्या प्रवासात मिळालेल्या सौजन्याची पावती असतात. लेखकाने भारतातून निघतानाच एका हाफ मॅरेथॉनमध्ये रजिस्ट्रेशन केले होते.. 9/11 मेमोरियल मॅरेथॉन! योगायोगाने लेखकाचा या स्पर्धेत तिसरा क्रमांकही आला आहे हे वाचून कौतुक वाटते, पण त्यापेक्षा जास्त आनंद लेखकाला अमेरिकेतील भारतीय स्पर्धकांनी ज्या कौतुकाने आणि अगत्याने तिरंगा उंचावला त्याचे जाणवते.
आईने केलेले फोडणीचे पोहे, त्याची कृती, “किती बारीक गॅस आहे. जरा मोठा कर”, “हा मोठाच आहे, जळला मेला गॅस” या प्रकारातून निर्मित पोहय़ांची चव रिचर्डच्या डोळय़ांतील पाणी अन् कपाळावरील दवबिंदू त्याला बिचाऱयाला थेट कोल्हापूरला घेऊन गेली. नीलमसोबत मुद्दाम केलेली सुपर मार्केटची पिशव्या न घेता केलेली वारी. नंतर भेट दिलेली ठिकाणे म्हणजे ग्राऊंड झीरो, सेंट्रल पार्क, टाईम स्क्वेअर, वॉशिंग्टन, नायगारा, स्टॉक मार्केटजवळचा बैल, नॅशनल हार्बर, मर्लिन मन्रोचा पुतळा या सगळ्या गोष्टी आपण समोर उभं राहून प्रत्यक्षात बघतोय. जणू वाचक स्वतच अनुभवतोय, इतकं वास्तववादी समर्पक वर्णन लेखक करतात.
पुस्तक वाचून झाल्यावर हे नक्की जाणवलं की, सीनियर सिटिझनच्या सोबत जर कोणताही परदेश प्रवास करायचा असेल तर हे पुस्तक वाचल्यास व त्यातील बारकावे, अत्यावश्यक गोष्टी, वस्तू, पर्यायी योजना लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करणे सोपे होईल. शिवाय परदेश प्रवासातील अनुभवातून येणारे शहाणपण आपल्या शहरांमध्ये कसे परावर्तित करता येईल हा लेखकाचा विचार मनाला भावतो. तब्बल एक महिना आईसोबत अमेरिकेसारख्या देशातील सफर अनुभवण्यासोबत लेखकाने नात्यांचीही सफर घडविण्यात कमालीचा मिलाफ साधलाय. पुस्तकाचे मुखपृष्ठही कमालीचे सुंदर आहे.
अमेरिका ९वारी।
लेखक : उत्तम फराकटे
– प्रकाशक : संवेदना प्रकाशन, पुणे
– किंमत: रु. 240, किंमत: रु. ४००/-
Comments are closed.