Amit Deshmukh is chief whip, Satej Patil is group leader in MLC


(Congress) मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. राज्याची आर्थिक स्थिती, लाडकी बहीण योजना, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, तीर्थदर्शन योजना आदी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. या मुदद्यांसह शेतकऱ्यांचे तसेच बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न सरकारचा राहील. विशेषत:, आरोग्य खात्यातील कथित घोटाळा हा केंद्रस्थानी असण्याची चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे, संतोष देशमुख हत्या, वाल्मीक कराड, नामदेव ढसाळ यांच्यावरील चित्रपट, नीलम गोऱ्हे मर्सिडीज प्रकरण, पुणे बलात्कार प्रकरण हे मुद्देही विरोधकांकडून उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित केल्या. (Amit Deshmukh is chief whip, Satej Patil is group leader in MLC)

येत्या 3 मार्चपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन साडेतीन आठवडे म्हणजे 26 मार्चपर्यंत चालणार आहे. 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. विधानभवनात रविवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, त्यात अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार 8 मार्च 2025 रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. तर 13 मार्च 2025 रोजी होळी निमित्त कामकाजास सुट्टी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वाधिक म्हणजे 20 आमदार निवडून आले. त्यामुळे ठाकरे गटाकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्यात येणार आहे. परंतु, शिवसेना आणि काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे डिसेंबरमध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाला दावा करता आला नव्हता. आता या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला आहे.

तर, काँग्रेसनेही विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार विधानसभेत मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख, उपनेते पदावर अमीन पटेल आणि सचिव म्हणून विश्वजित कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांच्यावर पक्ष प्रतोद पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधान परिषदेच्या गटनेतेपदी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची फेरनियुक्ती झाली आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून अभिजित वंजारी आणि प्रतोद म्हणून राजेश राठोड यांना नेमण्यात आले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : …तर फडणवीसांच्या प्रत्येक कृतीचे स्वागत करू, संजय राऊत असे का म्हणाले?





Source link

Comments are closed.