अमित शहा तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल; ही काही देशावर, लोकशाहीवर, संसदेवर मेहरबानी नाही! – संजय राऊत

अमित शहा सभागृहात येणार ही अफवा आहे असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीतील निवासस्थानी या विषयावर अधिक बोलताना ते म्हणाले, अमित शहांनी येण्याचे मन बनवले आहे तर ते काय देशावर, लोकशाहीवर, संसदेवर मेहरबानी करताहेत का? येऊ देत संसदेत बघुया. उपकार करताहेत का ते संसदेत येऊन असे म्हणत संजय राऊत यांनी शरसंधान साधले.

यासंदर्भात अधिक बोलताना राऊत म्हणाले, तुम्हाला संसदेत यावंच लागणार. ही देशाची ताकद आहे. ज्या पद्धतीने तुम्ही जंतरमंतरवरील आंदोलकांवर पेलेट गन चालवली, अश्रूधुर सोडला असे खूप अत्याचार केले आहेत. त्यामुळे तुम्हाला उत्तर देणं हे भाग आहे. तुम्ही तर राजीनामा द्यायला हवा, याजागी दुसरा काॅंग्रेसचा मंत्री असता तर, तुम्ही लोकांनी राजीनामा घेतला असता. यासंदर्भात अधिक भाष्य करताना राऊत म्हणाले, शिवराज पाटील यांनी कपडे बदलून बाॅम्बस्फोटाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला होता आणि तुम्ही जेन झी आंदोलकांवर इतका अत्याचार केलाय की, विचारता सोय नाही. मग तुम्ही का त्या जागेवर अजून बसलेले आहात. तुम्ही देव आहात का? असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला.

राज्यात नवीन उद्योगधंदे येत आहेत या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, राज्यामध्ये सध्याच्या घडीला साडेतीन हजार कंपन्या बंद का झाल्या आहेत त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. कुठे आहे रोजगार? असा प्रश्न विचारत राऊतांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. यावर अधिक बोलताना ते म्हणाले सरकारच्या धोरणांना, खंडणीखोरीला कंटाळून राज्यामध्ये अनेक उद्योग बंद झाले आहेत. एमआयडीसीची अवस्था बघा. माझ्याकडे प्रत्येकाचा सर्व हिशोब आहे. माझ्या इतका हिशोब सरकारच्या आॅडिरटर जनरलकडे नाही असे म्हणत राऊतांनी राज्यातील सरकारी धोरणांवर टीका केली. राऊत म्हणाले, सरकारमध्ये कसे सर्व फावडे घेऊन बसले आहेत. सरकारी तिजोरी खोऱ्याने लुटताहेत, जमिनी कशा विकल्या जाताहेत. शाळेपासून ते आरोग्य खात्यापासून आदिवासी खात्यापर्यंत सर्वत्र लाचखोरी सुरू आहे. कुठे जातोय निधी काय करताहेत देवेंद्र फडणवीस? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांनी विचारला आणि सरकारवर टीकास्त्र सोडले.

हातात तिरंगा घेऊन मोदींसमोर खासदार तिरंगा रॅली करणार आहेत या माध्यमांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, हा सर्व मुर्खांचा कारभार आहे. मानसिक दृष्ट्या हे लोकं विकलांग आहेत. मनोरुग्ण आहेत हे सर्व लोक आणि या मनोरुग्णांवर उपचार जरा कठीण आहे. सरकार बदलणं आणि मनोरुग्णांवर सामुदायिक उपचार करणं हाच एक मार्ग शिल्लक आहे. यांना गुंगीचं औषध देऊन झोपवलं पाहिजे सर्वांना किंवा यांना चहातून भांग दिली पाहिजे असे म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

झारखंडमधील घटनेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, हे बघा आता पूर्ण देशात तरुणवर्ग हा बंडखोरीवर उतरला आहे हे या पाहता या सरकारला जावं लागणार. ज्या राज्यात सरकार जनतेच्या खासकरून तरुणाईच्या विरोधात काम करेल तिथले तरुण रस्त्यावर येणार आणि त्यांना थांबवणं आता मुश्कील आहे. झारखंडमध्ये सध्या जे तरुणांच्या बाबतीत सुरू आहे ही तिथल्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. हेमंत सोरेन यांनी मुलांशी संवाद साधायला हवा होता. मोदी आणि अमित शहा यांनी जंतरमंतर वरील जेन झी आंदोलकांशी संवाद साधायला हवा होता. तसेच झारखंडमध्ये तिथल्या तरुणांशी संवाद साधायला हवा.

वंदे मातरम लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा गायलं जाणार या माध्यमांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, या देशात वंदे मातरमची सुरूवात काॅंग्रेसच्या काळापासून झाली आहे. काॅंग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम गायलं गेलं आहे. मोदींनी ही नौंटकी बंद करायला हवी. तुमचा वंदे मातरमशी काही संबंध नाही. जे लोक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 50 वर्षे स्वतःच्या कार्यालयावर तिरंगा नव्हते लावत, ते आता वंदे मातरम गाण्याची नौंटकी करू लागले आहेत. आम्हाला देशभक्ती शिकवु नका. तुमच्याकडून आम्हाला शिकण्याची गरज नाही. देशभक्ती आणि वंदेमातरम हा कुठलाही सोहळा नाही हा आमचा आत्मा आहे. जो मोदींकडे नाही..

Comments are closed.