IND vs ENG: ‘अरे गोऱ्याला…’ मँचेस्टरमध्ये टेस्ट सामना ड्रॉ झाल्यावर अमिताभ बच्चन यांची मजेदार प्रतिक्रिया व्हायरल

मँचेस्टरमध्ये दोन दिवसांपर्यंत तडाखेबाज लढत दिल्यानंतर टीम इंडिया चौथा टेस्ट सामना ड्रॉ करण्यात यशस्वी ठरली. शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्या उत्कृष्ट खेळीनंतर वॉशिंगटन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी क्रीजवर ठामपणे उभे राहत इंग्लिश गोलंदाजांना नांगी टाकायला लावली. जडेजा आणि सुंदर दोघांनीही शतक झळकावले. सुंदर 101 धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने 107 धावा फटकावल्या. भारतीय फलंदाजांनी जवळपास पाच सेशनपर्यंत फलंदाजी करत इंग्लंडच्या सर्व आशांवर पाणी फिरवलं. सामना ड्रॉ झाल्यानंतर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची मजेदार प्रतिक्रिया समोर आली.

ओल्ड ट्रॅफर्डमध्ये ड्रॉ झालेला सामना भारतीय संघासाठी विजयास कमी मानला जात नाही. पहिल्या डावात इंग्लंडने 311 धावांची आघाडी घेतल्यानंतर अनेकांनी टीम इंडियाचा पराभव ठरलेला मानला होता. मात्र, भारतीय फलंदाजांनी हार मानण्यास नकार दिला आणि जबरदस्त झुंज दिली. सामना ड्रॉ झाला, आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही टीम इंडियाचं कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर आनंद व्यक्त करत लिहिलं, “टेक?? अरे गोऱ्याला टिचून बसवलं रे।” यासोबतच त्यांनी हसण्याची इमोजीही शेअर केली.

222 धावांवर कर्णधार शुभमन गिल माघारी परतल्यानंतर एक क्षण असा वाटला की सामना टीम इंडियाच्या हातातून निसटेल. मात्र, त्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांनी डाव सांभाळत पाचव्या विकेटसाठी 203 धावांची अभेद्य भागीदारी रचली. सुंदरने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत 101 धावांवर नाबाद राहिला. तर जडेजाने देखील 107 धावांची शानदार खेळी केली. सुंदर-जडेजा यांच्या खेळीपुढे इंग्लंडचा कर्णधार वापरत असलेला प्रत्येक डाव अपयशी ठरला आणि मँचेस्टरमध्येच मालिका जिंकण्याचं यजमानांचं स्वप्न फक्त स्वप्नच राहून गेलं. कर्णधार गिलने शतकी खेळी करत 103 धावा केल्या, तर केएल राहुलने 90 धावांची दमदार खेळी साकारली.

Comments are closed.