प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी आव्हाड आणि रोहित पवार उतावीळ? मिटकरींचा टोला, जयंत पाटलांचं कौतुक
अमोल मिटकरी: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चिंतन शिबिरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हटवण्याची मागणी काही नेत्यांनी केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. शरद पवार गटात जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला होणारा विरोध हा त्यांचा मराठा द्वेष दाखवतो का? असा सवाल त्यांनी केलाय. जयंत पाटलांवर स्तुतीसुमनं उधळतांना मिटकरींनी त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेल्या कामांचा दाखला दिला आहे. यासोबतच प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार उतावीळ झालेत का? असा सवालही त्यांनी केलाय. जयंत पाटलांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे अनेक दुर्योधन शरद पवार गटात असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय.
जयंत पाटील प्रत्येक बूथपर्यंत गेले त्यांनी मोठं संघटन केलं
दरम्यान, काही महिन्यापूर्वीच सांगितलं होतं जयंत पाटील यांचा कुणीतरी करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीत आहे. तेच काल दिसल्याचे मिटकरी म्हणाले. मराठा प्रदेशाध्यक्ष सोडून कोणीही करा, असा हट्ट होतो. त्यांच्यात मराठा द्वेष भरला आहे का? असा सवाल मिटकरींनी केलाय. जयंत पाटील यांच्यासारखा मोठा नेता, ते प्रत्येक बूथपर्यंत गेले. मोठं संघटन त्यांनी केलं. अशा एवढ्या मोठ्या नेत्याला हटवण्याचा घाट घातला जातोय असे मिटकरी यांनी म्हटलं आहे. #जितेंद्र आव्हाडांनाच अथवा कर्जत जामखेडच्या आमदाराला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे का?असा सवालही यावेळी मिटकरींनी केला. जयंत पाटील यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेणारे अनेक दुर्योधन तिकडे आहेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला. दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या टाकळी येथील माऊली उमेश सोट या तरुणाच्या प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी सरकारकडे केली.
राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी करणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी आव्हान दिलं आहे. पुढच्या दोन दिवसात प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं दिली त्याचा डेटा द्या, आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं जयंत पाटील म्हणाले. पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागलं असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या बातम्या:
Jayant Patil : … तर 8 दिवसात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो; प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी करणाऱ्यांना जयंत पाटलांचं आव्हान
अधिक पाहा..
Comments are closed.