“मी स्वतःला सोशल मीडियापासून दूर…” अमोल मुझुमदारांनी घरी परतल्यावर सांगितलं विश्वचषक विजयाचं रहस्य
नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानावर रविवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या यशाचे शिल्पकार ठरले प्रशिक्षक अमोल मुझुमदार. मुंबईचा रणजी योद्धा असलेला हा प्रशिक्षक आता देशभरात चर्चेत आहे. संघाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुझुमदार म्हणाले, “हरमनने ट्रॉफी उचलली तेव्हा डोळ्यांत पाणी आले. आमची दोन वर्षांची मेहनत पूर्ण झाली. आम्ही फक्त 30 ऑक्टोबरच्या सेमीफायनलचा नाही, तर 2 नोव्हेंबरच्या फायनलचा विचार करूनच रणनीती आखली होती. तो दिवस माझ्या आयुष्यातील खास दिवस ठरला. माझ्या वाढदिवसाच्या महिन्यातच टीमने मला सुंदर भेट दिली.”
ते पुढे म्हणाले, “माझ्या वडिलांनी नेहमी सांगितलं धावा करत राहा, मेहनत करत राहा. हाच मंत्र मी या संघाला दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांनी 338 धावांचा डोंगर उभारला होता, पण मी ड्रेसिंग रूममधल्या बोर्डवर लिहिलं ‘We just need one more run for final’. तो आत्मविश्वास आमच्या खेळात उतरला आणि आम्ही चमत्कार केला.”
विश्वचषकाच्या तयारीदरम्यान मुझुमदार यांनी स्वतःसाठीही काही कठोर नियम पाळले. “गेल्या दोन महिन्यांपासून मी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केला होता. बायकोलाही सांगितलं होतं की, काहीही अपडेट मला सांगू नकोस. त्या काळात मला घरचा वरणभात आणि फिश फ्राय खूप आठवायचा,” ते हसत म्हणाले.
विजयानंतर ते मुंबईच्या पार्ले येथील आपल्या जयविजय सोसायटीत खास परवानगी घेऊन घरी आले. “22 वर्षं मी इथेच राहतोय. आज परतल्यावर पहिलं काम म्हणजे घरचं जेवण खाणं! ही सोसायटी माझं दुसरं कुटुंब आहे,” असं भावुक होत त्यांनी सांगितलं.
अमोल मुझुमदार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने जिंकलेला हा विश्वचषक भारतीय क्रिकेटसाठी एक नवा अध्याय ठरला आहे.
Comments are closed.