बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
अमरावती : भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या डायल 112 क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करुन नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राजापेठ पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही नवनीत राणा यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हिंदू शेरणी, आणि निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथील भाषणानंतर त्यांना धमकी देण्यात आली होती. आता, पुन्हा एकदा त्यांना फोनवरुन धमकी देण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात नुकतेच महापालिका निवडणुका पार पडल्या असून अमरावतीत भाजप आणि आमदार रवि राणा यांच्या पक्षाला यश मिळालं आहे. महापालिका विजयानंतर राणा दाम्पत्याने विजयाचा आनंद साजरा केला. मात्र, या निवडणुती एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीता राणांवर केलेली टीका चांगलीच चर्चेत आली. कारण, नवनीत राणांनी काही दिवसापूर्वी मुलांना जन्म घालण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. ओवैसी यांनी आपल्या भाषणात तोच मुद्दा उपस्थित करत नवनीत राणांना डिवचलं होतं. त्यानंतर, आता पोलिसांना फोन करुन नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू असा फोन पोलिसांना 112 नंबरवर आला होता. या संदर्भात नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी, पुढील तपास सुरू आहे.
नोव्हेंबर महिन्यातही पत्राद्वारे धमकी
दरम्यान, यापूर्वी हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या एका व्यक्तीकडून घाणेरड्या शब्दात नवनीत राणांना पत्र स्वरुपात धमकी आली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आठवडाभरात त्यांना धमकीचे दुसऱ्यांदा पत्र आले होते. तेव्हाही, राणा यांच्या पीएच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
आणखी वाचा
Comments are closed.