अमरावती महापालिकेत भाजपनं स्वीकृत नगरसेवक निवडले, मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती नाराज
अमरावती : अमरावती महापालिकेत भाजपनं युवा स्वाभिमानच्या साथीनं सत्ता स्थापन केली आहे. अमरावती महापालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर करण्यात आली. भाजपकडून 2 जणांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली. यापैकी एका नगरसेवकाच्या निवडीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विवेक कलोती यांनी फेसबुक पोस्ट करत मनातील खदखद सर्वांसमोर मांडली आहे.
विवेक कलोती यांनी आज भाजपकडून दोन स्वीकृत नगरसेवक सदस्यांची निवड झाल्यानंतर त्यापैकी एकाच्या निवडीवरून फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप कडून स्वीकृत सदस्य म्हणून प्रशांत देशपांडे आणि संजय तिरथकर यांची निवड करण्यात आली. संजय तिरथकर यांच्या निवडीवरून विवेक कलोती नाराज असल्याचं समजते.
विवेक कलोती यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय?
उमेदवारी न मिळाल्याने घरात बाई सारखे रुसून बसणाऱ्या आणि पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस असं विवेक कलोती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, विवेक कलोती यांनी अमरावती महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.
अमरावती महानगरपालिका मध्ये 8 स्वीकृत सदस्यांची निवड
भाजप
1) अँड. प्रशांत देशपांडे
२) संजय तिरथकर
राष्ट्रवादी काँग्रेस
1) भोजराज काळे..
तरुणांचा स्वाभिमान
1) संजय हिंगासपुरे
काँग्रेस
1) मिलिंद चिमोटे
2) अनिल अग्रवाल (अमरावती मंडळ संपादक)
बसपा, शिवसेना, शिवसेना UBT यांच्या गटातून
1) दिनेश बुब (लोकसभा निवडणुकीत प्रहारचे उमेदवार )
एमआयएम
१) सय्यद मुझहर अली
अमरावती महानगरपालिकेत भाजपकडून महापौर म्हणून श्रीचंद तेजवानी आणि युवा स्वाभिमानकडून उपमहापौर म्हणून सचिन भेंडे यांना संधी देण्यात आली आहे.अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. नगरसेवकांकडून उपस्थित केलेल्या कचऱ्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अनेक नगरसेवक आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळालं. शहरात स्वछतेचे तीनतेरा वाजले असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. आजच्या पहिल्या सभेत 11 प्रश्न आणि 23 प्रस्ताव सादर केले. मात्र 11 प्रश्नांपैकी तब्बल 7 प्रश्न आणि 23 पैकी 14 प्रस्ताव हे संबंधित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील साफसफाई आणि कचऱ्याच्या समस्येबाबत केले होते.
आणखी वाचा
Comments are closed.