लालूंच्या कुटुंबात विसंवादाचे वातावरण

बिहार निवडणुकीतील पराभवानंतर मुलगी रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी संबंध तोडले

वृत्तसंस्था/ पाटणा

2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या दारुण पराभवानंतर राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ आले आहे. प्रथम निकाल जाहीर झाल्यानंतर मुलगा तेजप्रताप यादव यांनी तेजस्वी यादवला ‘पेलस्वी’ (अपयशी) असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए नेत्यांचे कौतुक केले. त्यानंतर आता, मुलगी रोहिणी आचार्य यांनी शनिवारी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली. सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहिणी यांनी राजकारण सोडण्याचा आणि आपल्या कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 202 जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला, तर महाआघाडीच्या जागा 35 पर्यंत कमी झाल्या. या निकालानंतर रोहिणी आचार्य यांनी धक्कादायक विधान करत संजय यादव आणि रमीज यांनी आपल्याला असे करण्यास सांगितल्याचा दावा केला. मात्र, त्यानंतर ‘मी सर्व दोष स्वत:वर घेत आहे,’ असे ट्विट रोहिणी यांनी केले. रोहिणी आचार्य यांनी सुरुवातीला फक्त राजकारण सोडण्याबद्दल आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याबद्दल लिहिले होते. तथापि, नंतर मजकूर संपादित करून संजय यादव आणि रमीज यांची नावे समाविष्ट करण्यात आली. आता ती सर्व दोष स्वत:वर घेत आहे. रोहिणी यांनी ट्विटरवर केलेल्या या पोस्टमुळे राजद गटात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. संजय यादव हे राजदचे राज्यसभा खासदार असून तेजस्वी यादव यांचे सर्वात विश्वासू सहकारी आहेत. रमीझ हे तेजस्वी यांचे दीर्घकाळचे मित्र असल्याचे सांगितले जाते आणि शेजारच्या उत्तर प्रदेशातील एका राजकीय कुटुंबातील आहेत.

रोहिणी यांच्याकडून लालूंना किडनीदान

रोहिणी आचार्य यांनी 5 डिसेंबर 2022 रोजी त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केली होती. सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी झाले आणि देशभरात त्यांचे कौतुक झाले. रोहिणी तिच्या कुटुंबासह सिंगापूरमध्ये राहतात. सध्या, त्या निवडणुकीसाठी बिहारमध्ये आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी भाऊ तेजस्वी यांचा प्रचारही केला होता. रोहिणी यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Comments are closed.