कॅनडात हिंदुस्थानी विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ, टोरँटो विद्यापीठाजवळ झाडल्या गोळ्या; दहशतीचे वातावरण

कॅनडातील टोरँटो शहरात एका हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवांक अवस्थी (20) असे या तरुणाचे नाव आहे. एका आठवड्यात हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्याच्या हत्येची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे कॅनडातील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टोरँटो शहरातील टोरँटो विद्यापीठाच्या परिसरात शिवांक अवस्थीवर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले होते. शिवांक याला घटनास्थळीच मृत जाहीर करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. शिवांक हा टोरँटो विद्यापीठात तिसऱ्या वर्षात शिकत होता. तो अतिशय हुशार आणि मनमिळावू विद्यार्थी होता. त्याच्या हत्येमुळे आम्हाला धक्का बसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात हिमांशी खुराणा या 30 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली होती. तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
कॅनडात हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले वाढले
गेल्या काही दिवसांमध्ये कॅनडामध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. या वर्षी आतापर्यंत कॅनडामध्ये 41 हिंदुस्थानी नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. 2019 ते 2023 या कालावधीत अशा हल्ल्यांमध्ये 200 टक्के वाढ झाली आहे.
हल्ले कशामुळे वाढले?
हिंदुस्थानी विद्यार्थी आणि स्थलांतरितांची संख्या कॅनडामध्ये वेगाने वाढली आहे. कॅनडातील मूळ रहिवासी याला अतिक्रमण म्हणतात. त्यामुळे हिंदुस्थानी नागरिकांविरोधात द्वेष वाढला आहे. याशिवाय खलिस्तानच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये राजकीय तणावदेखील वाढला आहे. याच कारणांमुळे कॅनडाकडून हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे.

Comments are closed.