अँडी बर्नहॅम होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान? कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर शर्यतीत आघाडीवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर आता देशाच्या नव्या नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान आणि सत्ताधारी लेबर पार्टीचे सर्वोच्च नेते म्हणून ग्रेटर मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम यांचे नाव शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये किंग ऑफ द नॉर्थ म्हणून ओळखले जाणारे बर्नहॅम हेच आता ब्रिटनचे संभाव्य पंतप्रधान मानले जात आहेत. नुकत्याच झालेल्या मेकरफिल्ड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयानंतरच स्टार्मर यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान उभे राहिले होते. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अँडी बर्नहॅम हे २०१७ पासून ग्रेटर मँचेस्टरचे महापौर म्हणून कार्यरत असून या शहराच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. विशेषतः कोविड-१९ महामारीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारविरोधात त्यांनी उत्तर इंग्लंडला योग्य आर्थिक मदत मिळावी यासाठी थेट संघर्ष केला होता. त्यांच्या या ठाम आणि लोकोपयोगी भूमिकेमुळेच जनतेने त्यांना किंग ऑफ द नॉर्थ ही पदवी दिली. अलीकडेच झालेल्या मेकरफिल्ड पोटनिवडणुकीत सुमारे ५५ टक्के मते मिळवून त्यांनी रिफॉर्म यूके पक्षाच्या उमेदवाराचा तब्बल नऊ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या विजयानंतर बर्नहॅम यांनी थेट राष्ट्रीय राजकारणात परतण्याचे स्पष्ट संकेत देत ब्रिटनमध्ये बदलाची लाट आणण्याची घोषणा केली होती.

कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर अँडी बर्नहॅम यांनी अधिकृतपणे लेबर पार्टीच्या नेतृत्वपदाच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. जनतेला स्थैर्य, आर्थिक विकास, महागाईपासून दिलासा आणि सक्षम सार्वजनिक सेवा देण्यावर आपला प्रमुख भर असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed.