अनिकेत पटवर्धनांच्या पोस्टमुळे भाजपमधील धूसफूस चव्हाट्यावर, आगामी निवडणुकीत लक्ष न घालण्याची भूमिका

रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नंतर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.नगरपरिषद निवडणुकीत समन्वयक म्हणून काम करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या पोस्टमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपण लक्ष देणार नाही अशी पोस्ट अनिकेत पटवर्धन यांनी केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटलेले असताना भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी एक पोस्ट टाकून भाजप रत्नागिरीतील स्थानिक मंडळीचा आपल्याला विरोध असल्याचे सांगून भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फोडले आहे.नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात आपण समन्वयाची भूमिका बजावली मात्र यापुढे जिल्हा परिषद,नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही आपण रत्नागिरी जिल्ह्यात लक्ष देणार नाही असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये सांगताना भाजपच्या जिल्ह्यातील ग्रुपमधून आपण एक्सिट होत असल्याचे जाहिर केले आहे.अनिकेत पटवर्धन यांच्या ‘एक्सिट’ पोस्टमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपमधील धूसफूस समोर आली आहे.

Comments are closed.