अनिल अंबानी यांचा मुलगा सीबीआयच्या रडारवर

दिल्लीत सहा तासांहून अधिक काळ चौकशी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणातील सीबीआयचा तपास आता विस्तारत चालला आहे. या प्रकरणासंदर्भात सीबीआयने अनिल अंबानी यांचे पुत्र जय अंबानी यांची चौकशी केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र जय अंबानी यांची या प्रकरणासंदर्भात सहा तासांहून अधिक काळ चौकशी केली. जय शनिवारी सकाळी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले आणि त्यांची सुमारे साडेसहा तास चौकशी करण्यात आली. पुढील चौकशीसाठी त्यांना पुन्हा हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून हा फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आर्थिक अनियमिततेमुळे बँकेला अंदाजे 228.06 कोटींचे चुकीचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. गेल्यावर्षी 6 डिसेंबर रोजी दाखल केलेल्या या प्रकरणात रिलायन्स होम फायनान्स, माजी सीईओ आणि पूर्णवेळ संचालक रवींद्र सुधाळकर, जय अनमोल अंबानी आणि अनेक अज्ञात व्यक्ती आणि सरकारी कर्मचाऱ्यांची नावे आरोपी म्हणून आहेत.

Comments are closed.