Anil Parab alleges that RSS has a hidden agenda to divide Mumbai into linguistic divisions


मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मराठी भाषेबाबत मुक्ताफळं उधळली आहे. त्यांनी म्हटले की, मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं गरजेचं नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचे आज (6 मार्च) विधान परिषदेत पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. मराठीला अभिजित भाषेचा जो दर्जा दिला आहे, त्याला कुठेही धक्का लागणार नाही, यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात केली. (Anil Parab alleges that RSS has a hidden agenda to divide Mumbai into linguistic divisions)

289 चा प्रस्ताव मांडत अनिल परब म्हणाले की, महाराष्ट्रात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल आम्ही सर्व केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो. मराठी भाषेचं सांस्कृतिक महत्त्व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. असे असतानाही मराठी भाषेला दुय्यम दर्जाची वागणूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बुधवारी दिली गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी विद्याविहार येथील सभेत म्हटले की, मुंबईत राहणाऱ्याला मराठी आलंचं पाहिजे, असं गरजेचं नाही. विद्याविहार आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, असेही त्यांनी म्हटले. काही भाग गुजराती, मराठी, उत्तर भारतीय, ख्रिश्चन यांना देऊन मुंबईचे भाषिक तुकडे पाडण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Ambadas Danve : मोहित कंबोज राज्याचा जलसंपदा विभाग चालवतात, दानवेंचा सभागृहात दावा

अनिल परब म्हणाले की, उद्योगधंदे आधीच गुजरातमध्ये घेऊन गेले आहेत. बाकीच्या सर्व गोष्टी गुजरातमध्ये नेल्या आहेत. आता मुंबईच्या तुकड्यांना गुजराती भाषा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटकोपरमध्ये मराठी आणि इतर भाषिक राहत नाही का? हे कुठचं स्तोम मुंबईमध्ये माजवलं जात आहे. या गोष्टीचा सत्ताधाऱ्यांकडून साधा निषेध सुद्धा होताना दिसत नाही. भैय्याजी जोशी यांनी मुंबईची माफी मागायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आम्ही सहन करत नाही, तसाच मराठी भाषेचा देखील अन्याय आम्ही सहन करणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजलं पाहिजे. तसेच मुंबईत येणाऱ्या माणसाने किमान मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीचं लेबल मराठी माणसाला बाजूला सारून गुजरातीमध्ये घेण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे. यासाठी जे गुजरातीकरण केलं जात आहे, त्याचा मी निषेध करतो, असे परब म्हणाले.

अनिल परब म्हणाले की, सरकारने भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर माफी मागावी. तसेच मराठीला अभिजित भाषेचा जो दर्जा दिला आहे, त्याला कुठेही धक्का लागणार नाही, यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. मात्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे म्हणाले की, अनिल परब आणि इतर सर्वांनी दिलेला 289 चा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुरुवातीला 10 मिनिटे आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

हेही वाचा – Sanjay Raut : ‘मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही’ म्हणणाऱ्या जोशींवर राऊत संतापले; म्हणाले, हे तर औरंगजेबापेक्षा…



Source link

Comments are closed.