रामदास कदमांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार, रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवणार!- अनिल परब
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युचे घाणेरडे राजकारण करणाऱ्या रामदास कदम यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत खरपूस समाचार घेतला. रामदास कदम यांनी नीचपणा केला असून त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आणि येणारी रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवणार, असे अनिल परब म्हणाले.
रामदास कदम यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केली. खरे म्हणजे याचे उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती, कारण पोरी-बाळी नाचवून, त्यांची दलाली खावून भाडगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावे एवढी त्यांची लायकी नाही. तरी देखील आमच्या दैवताच्या, बाळासाहेबांच्या मृत्युवरती त्यांनी संशय घेतला आहे म्हणून उत्तर देणार. बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी 24 तास तिथे होतो. मी सगळ्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे, असे अनिल परब म्हणाले.
बाळासाहेब गेल्यानंतर 14-15 वर्षानंतर रामदास कदम यांना आता कंठ फुटला आहे. बाळासाहेब 2012 ला गेले. 2014 ला रामदास कदम मंत्री झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्री केले. त्यावेळी तर बाळासाहेब नव्हते, मग उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर 2014 ला त्यांनी मंत्रीपद का स्वीकारले? 2014 ते 19 मंत्रीपद ओरपले, 2019 ला मुलाला आमदारकी घेतली. म्हणजे शिवसेनेकडून जोपर्यंत सगळे मिळत होते, उद्धव ठाकरेंकडून सगळे मिळत होते, तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. उद्धव ठाकरे यांनी जर काही वाईट केले असते आणि तुम्ही स्वत:ला स्वाभिमानी समजता, तर तुम्ही त्याचवेळी पक्ष सोडायला पाहिजे होते आणि सांगायला पाहिजे होते की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, 2012 ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते, हा बाकडा मी शोधतोय. ‘मातोश्री’वर अशा कुठल्या बाकड्यावर कुणाला झोपायला देत नाहीत. बाळासाहेब शेवटचे दिवस ज्या खोलीत होते तिथे 24 तास डॉक्टरांचे पथक होते. प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केले जात होते. असंख्य लोक भेटायला येत होते आणि सगळ्यांना माहिती होते बाळासाहेब जिवंत आहेत. बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती. आता त्याचे राजकारण करायचे आणि महाराष्ट्रात जे प्रश्न उभे ठाकले आहेत त्या सगळ्या गोष्टींपासून लक्ष बाजुला करायचे असा हा कुटील डाव आहे.
रामदास कदम सांगताहेत की नार्को टेस्ट करा. आमचे म्हणणे आहे की टेस्ट झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आले पाहिजे. रामदास कदम यांनी खोटे आरोप केले आहेत. मी स्वत: रामदास कदम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत आहे. या दाव्यामधून जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय घेतला आहे, असेही अनिक परब यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.