देवेंद्रजी, कधी घेताय योगेश कदमांचा राजीनामा, अनिल परबांनी दिले सर्व पुरावे
शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली बारप्रकरणी सर्व कागदोपत्री पुरावे आणि व्हिडीओ सादर केले. त्याचप्रमाणे कदम कुटुंबीयांकडून खेडमध्ये अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे व्हिडीओsही दिले. सर्व पुराव्यांची तपासणी करावी आणि योगेश कदम यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सावली बारवर मे महिन्यात पोलिसांनी छापा घातला होता. त्या छाप्यामध्ये 22 बारबाला आणि गिऱ्हाईकांना अटक झाली होती तसेच मोठय़ा प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली होती. अनिल परब यांनी तो मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात उचलून धरला होता. याप्रकरणी सर्व पुरावे आपण मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सावली डान्स बारवर झालेली कारवाई, 22 बारबाला 22 गिऱ्हाईके व रोकड रमकेचा पंचनामा, एफआयआरची प्रत, डान्स बारचे लायसन्स, यापूर्वी पडलेल्या छाप्यांचे पंचनामे, खेडमध्ये योगेश कदम आणि कुटुंबीयांकडून अवैध पद्धतीने होत असलेला वाळू उपसा याचे व्हिडीओ आणि छायाचित्रे तसेच डान्स बारसंदर्भातील कायदे अशी व्यवस्थित मांडणी करून आपण मुख्यमंत्री फडणवीस यांना सर्वे पुरावे दिले आहेत, असे अनिल परब यांनी सांगितले. परिवहन खात्याच्या एका अधिकाऱयाचा गणवेश घालून त्याचा ड्रायव्हर रस्त्यावर ई-चलान मशीन घेऊन वसुली करतो त्याचे व्हिडीओही मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सर्व पुरावे आपण तपासतो आणि त्यानुसार पुढील निर्णय घेतो असे आश्वासन दिल्याचे अनिल परब म्हणाले. सावली बार दुसऱयाला चालवायला दिला असा दावा रामदास कदम यांनी केला होता. मात्र डान्स बार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 79 अन्वये तुमच्या वतीने कुणीही गैरकृत्य केले असेल तर त्याची जबाबदारी मालकावर येते. सावली बारवर एकदाच नव्हे तर अनेकदा कारवाई झाली आहे. यापूर्वी 2023 मध्ये दोन वेळा त्या बारवर धाड पडली होती. कदम यांच्याकडून एकच गुन्हा पुनः पुन्हा घडला आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही, असे अनिल परब म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या आदेशावरून डान्स बार तोडले होते, तेच आता गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे असलेल्या बारला समर्थन देत आहेत, खुर्ची वाचवण्यासाठी गैरकृत्यांवर पांघरूण घालत आहेत, अशी टीकाही अनिल परब यांनी यावेळी केली.
दर पंधरा दिवसांनी स्मरणपत्र देणार
मुख्यमंत्र्यांना पुरावे दिले आहेत, त्यावर त्यांनी निर्णय घेतला नाही तर दर पंधरा दिवसांनी त्यांना आपण स्मरणपत्र देणार आहोत. त्यांनी कारवाई केली नाही तर त्यांचेही डान्स बारला अभय असल्याचे आपण समजू, असे परब म्हणाले.
Comments are closed.