अनिश दयाल सिंग आता 'डेप्युटी एनएसए'
निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची वर्णी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने निवृत्त आयपीएस अधिकारी अनिश दयाल सिंग यांची उप एनएसए म्हणून नियुक्ती केली आहे. अनिश दयाल सिंग हे 1988 च्या बॅचचे मणिपूर केडरचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नवीन भूमिका स्वीकारल्यानंतर, सिंग भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणांच्या निर्मिती, अंमलबजावणी आणि सुधारणांमध्ये एनएसए अजित डोवाल यांना मदत करतील. यामध्ये दहशतवादामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचे मूल्यांकन, डेटा उल्लंघन आणि चोरी, सायबर धोके, संबंधित एजन्सींची तयारी आणि सुरक्षा समस्या आणि बाबींशी संबंधित प्रमुख संस्थांमधील सहकार्य यांचा समावेश आहे. सिंग यांच्याकडे जम्मू काश्मीर, नक्षलवाद, ईशान्येकडील बंडखोरी यासह देशाच्या अंतर्गत बाबींची जबाबदारी असणार आहे.
केंद्र सरकारने अनिश दयाल सिंग यांच्याकडे गेल्यावर्षी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकच्या (एनएसजी) महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. तसेच ते सीआरपीएफचे महासंचालक होते. त्यापूर्वी ते आयटीबीपीचे महासंचालक देखील राहिले आहेत. याशिवाय त्यांनी सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) म्हणून काम पाहिले आहे. ते डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात त्यांची उप एनएसए म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली.
प्रयागराज, उत्तर प्रदेशमधील रहिवासी
सिंग यांचा जन्म 1964 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झाला. 1988 मध्ये भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये पोलीस अधिकारी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचे भाऊ सौमित्र दयाल सिंग अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिले आहेत. सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीत यापूर्वी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
Comments are closed.