Anjali Damania demanded that Operation Sindoor be implemented in Beed district to end the increasing hooliganism there
बीडच्या परळीमध्ये एका गुंड टोळीकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचपार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा बीड जिल्ह्यातील गुंडगिरीवर वळवला आहे.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा गेल्या काही महिन्यात चर्चेत आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे. धनंजय मुंडे यांनाही त्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे एक-एक प्रताप समोर आले होते. अशातच आता एका गुंड टोळीकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचपार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा बीड जिल्ह्यातील गुंडगिरीवर वळवला आहे. (Anjali Damania demanded that Operation Sindoor be implemented in Beed district to end the increasing hooliganism there)
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. भारताच्या या हल्ल्यात जवळपास 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताने याआधी दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. याचपार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया यांनी बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवण्याची मागणी केली आहे. जेणेकरून बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपुष्टात येईल.
हेही वाचा – Operation Sindoor : महाराष्ट्रातील दोघे जगभरात भारताची भूमिका मांडणार, दहशतवादाविरोधात पोहोचवणार संदेश
माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या की, आपण जसे ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते, तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केले पाहिजे. कारण बीडचा परळी तालुका आता दहशतीचा अड्डा झालेला आहे. त्यामुळे तेथील गुंडगिरीला आता अतिशय गंभीरतेने घ्यायला हवे. कारण कालची जी मारहाण झाली, त्याच्यात सगळे मुले अतिशय छोटी होती. 18 वर्षांच्या आसपासचे होती. त्यामुळे आपण जसे ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते, तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी (16 मे) सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतत असताना शिवराज दिवटे याचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला बांबू आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडीओदेखील चित्रीत केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी पोलीस आता सर्व आरोपींवर पुढे काय कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : बोलू का मी वर? ईडीच्या अटकेआधी राऊतांना आला होता एकनाथ शिंदेंचा फोन
Comments are closed.