Sangmeshwar News – बाईकसह तरुण कोसळला थेट नाल्यात, बहादूर शेख नाका-मुतप्पन मंदिर गेट येथे पुन्हा अपघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका मुतप्पन मंदिर गेट परिसरात आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. अरुंद रस्त्यामुळे दोन वाहनांची समोरासमोर टक्कर टळावी यासाठी एका तरुणाने गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला असता तो आपल्या बाईकसह रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळला.

हा तरुण कडवई गावचा रहिवासी असून गावाकडे जात असताना हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, याच ठिकाणी यापूर्वीही दोन वेळा गंभीर अपघात झाले आहेत. त्यापैकी एका अपघातात एका तरुणाचे अवयव निकामी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. सोमवारीही अशाच प्रकारचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनीही तातडीने क्रेनच्या साहाय्याने त्या तरुणाला आणि त्याच्या दुचाकीला बाहेर काढले. या वेळी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनानिधान तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित रस्ता समोरून अरुंद करण्यात आला असून त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित असल्याने संबंधित नॅशनल हायवे प्रशासन व हायवे कंत्राटदार यांनी तातडीने लक्ष घालणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

“एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल प्रकाश पवार, सुबोध सावंत-देसाई यांच्यासह स्थानिक नागरिक करत आहेत. प्रस्तावित पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात तरी योग्य उपाययोजना कराव्यात, वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी रस्ता रुंदीकरण, सुरक्षा भिंत, इशारा फलक व प्रकाशयोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार आणि अपघातांची मालिका थांबवण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.