तामिळनाडूमध्ये आणखी एक मोठा अपघात

चेन्नई थर्मल पॉवर स्टेशनवर कमान कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूतील उत्तर चेन्नई थर्मल पॉवर स्टेशनवर एनोर येथे बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. निर्मितीचे काम सुरू असलेली कमान कोसळल्याने नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले. प्राथमिक अहवालानुसार, सुमारे 30 फूट उंचीवरून लोखंडी कमानीचा काही भाग तेथे काम करणाऱ्या अनेक कामगारांवर कोसळला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे घटनास्थळी घबराट पसरली. अनेक कामगार लोखंडी कमानीखाली अडकल्यानंतर मोठ्या कष्टाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. कमान कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बचावकार्य सुरू असून तपास सुरू करण्यात आला आल्याचे अवाडी पोलीस आयुक्तांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घटनेचा सविस्तर आढावा घेत मदत व बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.

तीन दिवसांपूर्वीच तामिळनाडून चेंगराचेंगरी होऊन 31 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर आता अन्य एका मोठ्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींना तातडीने उत्तर चेन्नईतील स्टॅनली सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments are closed.