कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबावर परप्रांतीयाचा हल्ला, मुजोर पांडेची पोलिसासह पत्नी आणि आईला मारहाण

चार दिवसांपूर्वी कल्याणच्या अजमेरा हाईट्स इमारतीत अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतीय सरकारी अधिकाऱ्याने देशमुख कुटुंबावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा कल्याणमध्येच उत्तम पांडे नावाच्या परप्रांतीयाने एका मराठी पोलीस कुटुंबाला बेदम मारहाण केली. अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब त्या कुटुंबाने पांडेला विचारताच त्याने पोलिसांसह त्याची पत्नी व आईवर हल्ला केला. या घटनेत पोलीस कुटुंब जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, परप्रांतीयांच्या या वाढत्या मुजोरीविरोधात कल्याण-डोंबिवलीत संतापाची लाट उसळली आहे.

अखिलेश शुक्ला याने मराठी माणसे घाणेरडी आहेत, असा थयथयाट करत अजमेरा हाईट्स इमारतीत राहणाऱ्या देशमुख कुटुंबांवर भाडोत्री गुंडांकरवी हल्ला केला होता. त्यापाठोपाठ फोर्टच्या डाबर कंपनीमध्येही ‘एक बिहारी सब पे भारी’ अशी मुजोरी तेथील मॅनेजर मराठी कर्मचाऱ्यावर करत होता. पेणमध्येही परप्रांतीय भाजी विक्रेत्या महिलेच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असतानाच शनिवारी सायंकाळी अडिवली परिसरात थेट एका मराठी पोलीस कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.

अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, जाब विचारल्याने भडकला

अडिवली भागात राहणाऱ्या परप्रांतीय उत्तम पांडे (40) याने पोलीस कर्मचाऱ्याच्या नऊ वर्षांच्या मुलीला घरात ओढत नेत तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. याबाबत तिने पोलीस खात्यात असलेल्या आपल्या वडिलांना घरी जाऊन हा प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या या पोलीस कुटुंबाने पांडेला जाब विचारला. त्यावरून मुजोर पांडे व त्याच्या पत्नीने या पोलीस कुटुंबालाच शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला.

घटना सीसीटीव्हीत कैद

पांडे व त्याची बायको रिनाने केलेला हल्ला या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या मारहाणीत मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी, त्यांची आई व पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उत्तम पांडे व त्याच्या पत्नीची चौकशी सुरू असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

विलेपार्लेत परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी तरुणाला तुडवले

‘रिक्षा देखकर चलाओ’ असे म्हटल्याचा राग आल्याने तिघा परप्रांतीय रिक्षाचालकांनी मराठी तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार विलेपार्ले येथे घडला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अमोल क्षीरसागर असे या मराठी तरुणाचे नाव आहे. अमोल हा बीडब्ल्यूएफएस कंपनीत असून सध्या तो छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर लोडरचे काम करतो.

अमोल शुक्रवारी दुपारी दोन वाजता ड्युटीवर आला. त्यानंतर 4.30 वाजता नाश्ता करण्यासाठी तो विलेपार्ले येथील खाऊगल्लीत गेला. तिथून परतत असताना पोस्ट ऑफिससमोर एक रिक्षा थेट त्याच्या अंगावर आली. तेव्हा रिक्षा बघून चालव, असे अमोल म्हणाला. त्याचा त्याला राग आला आणि आणखी तिघे रिक्षाचालक त्याच्या साथीला आले. त्यांनी हुज्जत घालत, शिवीगाळ करत अमोलवर हल्ला केला. अमोल रस्त्यावर खाली कोसळला असता त्याच्या पोटावर बसून एका रिक्षाचालकाने त्याला मारहाण केली. तो कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला. राजेश पांडे, सर्वेश मिश्रा, विनोद दुबे, सैफ अशी हल्लेखोर रिक्षाचालकांची नावे असल्याचे समजते.

Comments are closed.