शिंदे गटावर आणखी एक मनीबॉम्ब! मंत्री गोगावले यांच्यासमोर नोटांची बंडलं, शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी व्हिडीओ दाखवला
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या मनीबॉम्बमुळे शिंदे गट घायाळ झाला असतानाच आज शेकापने शिंदे यांचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर आणखी एक मनीबॉम्ब टाकला. गोगावले नोटांच्या बंडलांसह दिसत असल्याचा व्हिडीओच शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांना दाखवला. ठेकेदारांकडून मिळणाऱया कमिशनची ही बंडले आहेत काय, असा सवाल पाटील यांनी केला. या मनीबॉम्ब व्हिडीओची सारवासारव करताना ऐन थंडीत शिंदे गटाला घाम फुटला आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असतानाच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीसमोर नोटांच्या बंडलांची रास पडली आहे असो तो व्हिडीओ होता. हा आमदार कोण? पैशांच्या गड्डय़ांसह तो काय करतोय, असा सवाल दानवे यांनी या पोस्टमधून केला. दानवे यांनी कुणाचेही नाव घेतले नव्हते, मात्र या मनीबॉम्बने शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी घायाळ झाले. त्यांनी हा मॉर्फ व्हिडीओ आहे. माझा याच्याशी काहीही संबंध नाही, अशी आगपाखड केली. दानवे यांच्या या व्हिडीओचे विधिमंडळाचे जोरदार पडसाद उमटले असतानाच शिंदे गटावर आज आणखी एक मनीबॉम्ब कोसळला. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आणखी एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांसमोर दाखवला. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले नोटांच्या बंडलांसह दिसत असल्याचा हा व्हिडीओ असून हा बघा मनीबॉम्ब-2 असे चित्रलेखा पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. दळवी आणि गोगावले यांच्या व्हिडीओची केंद्र आणि राज्य सरकारने सीबीआय, ईडी आणि अॅण्टी करप्शन ब्युरोमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणीच पाटील यांनी केली.
हे चिटर आमदार
माझी पार्श्वभूमी काय आहे ते आधी बघा, असे सांगणारे महेंद्र दळवी हे महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले आमदार आहेत, अशी कागदपत्रेच चित्रलेखा पाटील यांनी दाखवली. घरगुती हिंसाचारापासून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. हे चिटर आमदार आहेत. ते जनतेची कशी फसवणूक करत आहेत हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे हे सातत्याने जनतेसमोर सांगत असतात. काही तरी दिसतं म्हणूनच ते सांगतात ना, असा सवालही चित्रलेखा पाटील यांनी केला.
गोगावले यांची टोलवाटोलवी
चित्रलेखा पाटील यांच्या या व्हिडीओ बॉम्बनंतर भरत गोगावले यांची पळापळ झाली. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना गाठून मी फक्त नावाचाच शेठ आहे. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. इतके पैसे माझ्याकडे असते तर मी मुंबईत घर घेतले असते. मी बँकेतून कर्ज घेऊन घर घेतले आहे. माझी कोणतीही चौकशी करा, अशी सारवासारव गोगावले यांनी यावेळी केली.
ही कॅश कमिशनची तर नाही ना?
अलिबागमध्ये सगळी कामे अर्धवट पडली आहेत. याची विचारणा केली तर ठेकेदार सांगतात आमदारांच्या कमिशनखाली आम्ही दबलो आहोत. त्यामुळे ही कॅश या कमिशनची नाही ना, यांच्या प्रत्येक अकाऊंटची आणि संबंधित अधिकाऱयांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
चौकशी करा तटकरेंची मागणी
अंबादास दानवे यांनी नोटांची बंडलं असणारा व्हिडिओ प्रसारीत केला आहे. या प्रकरणात देशभक्त आमदार महेंद्र दळवी यांच्यावर विनाकारण आरोप होत आहेत, असा उपरोधीक टोला लगावत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीची मागणी केली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंनी सार्वजनिक केलेल्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला. तर व्हिडिओमध्ये दिसत असलेले शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी हा बनावट व्हिडिओ असल्याचे म्हटले. त्यासोबतच राष्ट्रीय खलनायकाकडून दानवेंना हा व्हिडिओ पाठवण्यात आल्याचा आरोप करत सुनील तटकरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता.
या प्रकरणी खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांसमोर येत खुलासा केला. तटकरे म्हणाले, देशभक्त महेंद्र दळवी हे निरागस आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तो व्हिडिओ मॉर्फ आहे. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रीय खलनायकाने हा व्हिडिओ अंबादास दानवे यांना दिल्याचा आरोप केला. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की, त्यांनी हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे हे तथ्य शोधून काढावे. ते निरागस देशभक्त असं सांगतात की, माझ्या लोकसभेवेळीचा तो व्हिडिओ आहे, तर त्याचीही चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घ्यावी, असे तटकरे म्हणाले.
302चा गुन्हा दाखल करा
नोटांच्या बंडल प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशन काळातच चौकशी पूर्ण करावी. या प्रकरणाचा तपास करून यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर 302सारखे गुन्हे लावता आले तर तेदेखील यामध्ये लावावेत, असे सुनील तटकरे म्हणाले.
Comments are closed.