न्यायमूर्ती वर्माविरूद्ध आणखी एक याचिका

एफआयआर दाखल करण्याची मागणी : तत्काळ सुनावणीस ‘सर्वोच्च’ नकार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

घरात सापडलेल्या रोख रक्कम प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. मात्र, सदर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज ख्रिस्त यांच्या खंडपीठाने वकील आणि याचिकाकर्ता मॅथ्यूज नेदुमपारा यांना याचिका दाखल करण्याची प्रक्रिया रितसरपणे पाळण्यास सांगितले. तसेच या प्रकरणाची तातडीने यादी आणि सुनावणी करण्यासाठी तोंडी उल्लेख करण्यास नकार दिला आहे. नेदुमपारा आणि इतर तिघांनी दाखल केलेल्या याचिकेत अंतर्गत समितीने न्यायाधीश वर्मा यांच्यावरील आरोप प्रथमदर्शनी खरे असल्याचे आढळून आल्याने तात्काळ फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंतर्गत चौकशीमुळे वर्मा यांच्यावर न्यायालयीन शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, परंतु लागू कायद्यांनुसार फौजदारी चौकशीचा पर्याय नसल्यावर याचिकेत भर देण्यात आला आहे.

Comments are closed.