चिनाब नदीवरील आणखी एका प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

इएसी’च्या मंजुरीमुळे निविदा जारी करण्याचा मार्ग मोकळा

मंडळ संस्था/श्रीनगर

भारताने जम्मू काश्मीरमधील किश्तवार जिह्यातील चिनाब नदीवर असलेल्या 260 मेगावॅट दुल्हस्ती स्टेज-2 जलविद्युत प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यांकन समितीने (इएसी) अलिकडेच झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला असून आता बांधकाम निविदा जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्पाची अंदाजे किंमत 3,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले.

पाकिस्तानने सिंधू जल कराराचा हवाला देत अशा प्रकल्पांना दीर्घकाळ विरोध केला आहे, परंतु भारताच्या ताज्या पावलांमुळे त्यांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. सिंधू जल कराराच्या स्थगितीमुळे भारताला पाश्चात्य नद्यांवर अधिक स्वातंत्र्य मिळाले असून जल सुरक्षा आणि ऊर्जा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, असे तज्ञांचे मत आहे.

1960 च्या सिंधू जल करारातील तरतुदींनुसार चिनाब खोऱ्यातील पाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामायिक करण्यात आले होते, याकडेही समितीने लक्ष वेधले. प्रकल्पाचे सर्व मापदंड या करारानुसार आहेत. तथापि, एप्रिल 2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने सिंधू जल करार रद्द करण्याची घोषणा करून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांवर पाकिस्तानचा अधिकार होता, तर रावी, बियास आणि सतलज नद्यांवर भारताचा अधिकार होता. कराराच्या निलंबनानंतर, भारताने सिंधू खोऱ्यातील अनेक जलविद्युत प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.

बोगद्यातून पाणी वळवणार

दुल्हस्ती टप्पा-2 प्रकल्प हा सध्याच्या 390 मेगावॅटच्या दुल्हस्ती स्टेज-1 जलविद्युत प्रकल्पाचा विस्तार आहे. या प्रकल्पात पाणी एका लांब बोगद्याद्वारे वळवले जाणार असून घोड्याच्या नालच्या आकाराचा तलाव तयार होईल. या प्रकल्पात दोन 130 मेगावॅट युनिट्स असतील. तर एकूण स्थापित क्षमता 260 मेगावॅटवर नेली जाईल. या प्रदेशातील वीज निर्मिती क्षमता मजबूत करणे आणि जम्मू आणि काश्मीरमधील जलविद्युत क्षमतेचा योग्य वापर करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.

Comments are closed.