'एका खराब सामन्यावरून कारकीर्द..', दमदार कामगिरीनंतर अंशुल कंबोज नेमकं काय म्हणाला?

भारतीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने (Anshul kamboj) बुधवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने 10 षटकांत केवळ 22 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याची इकॉनॉमी 2.20 इतकी होती. या कामगिरीसाठी अंशुलला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. (1st Odi between IND vs NZ)

अंशुलच्या कारकिर्दीतील हा केवळ दुसरा वनडे सामना होता. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 9 षटकांत तब्बल 82 धावा दिल्या होत्या. विशेष म्हणजे, त्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध दमदार पुनरागमन केल्यानंतर अंशुलने एका खराब सामन्यावरून खेळाडूची कारकीर्द ठरत नसल्याचे सांगितले.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 40.2 षटकांत 185 धावांवर बाद झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने (Arshdeep singh) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर गुरनूर बरारने 3 आणि अंशुल कंबोजने 2 विकेट्स मिळवल्या.

प्रत्युत्तरात भारतीय संघाने 22.4 षटकांत विजय मिळवला. भारताला 32 षटकांत 143 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले होते.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अंशुल कंबोज म्हणाला, एका खराब सामन्यावरून कोणत्याही खेळाडूची कारकीर्द ठरत नाही. मी नेहमीप्रमाणे माझ्या खेळाच्या तयारीवर आणि नियोजनावर लक्ष केंद्रित केले. एका सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही, तरी त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही. उलट, यामुळे मला आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. तसेच, कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, हे समजण्यास मदत झाली. प्रत्येक वेळी निकाल आपल्या बाजूनेच लागतात असे नाही.

स्वतःवर होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना अंशुल म्हणाला, मी अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. माझे लक्ष क्रिकेट खेळण्यावर आणि गोलंदाज म्हणून स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर असते. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात किंवा काय बोलतात, याकडे मी जास्त लक्ष देत नाही. त्यामुळे अशा गोष्टींचा माझ्यावर विशेष परिणाम होत नाही.

ईडन पार्कच्या खेळपट्टीबद्दल बोलताना अंशुल कंबोज म्हणाला, ईडन पार्कच्या खेळपट्टीवर चेंडूला थोडी हालचाल मिळत होती. मात्र, योग्य टप्प्यावर आणि योग्य दिशेने गोलंदाजी करणेही तितकेच महत्त्वाचे होते. खेळपट्टीकडून मदत मिळवण्याचा हाच एक मार्ग आहे. जर तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली नाही, तर फलंदाजांना धावा करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे मी जास्तीत जास्त चेंडू योग्य टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न करत होतो.

Comments are closed.