कंबोजला उघडले हिंदुस्थानी संघाचे द्वार, आकाश दीप आणि अर्शदीपला कव्हर करण्यासाठी चौथ्या कसोटीसाठी संघात निवड

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी हिंदुस्थानी संघाचे द्वार हरयाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजसाठी उघडण्यात आले आहे. फिटनेससाठी झगडत असलेल्या आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांना कव्हर करण्यासाठी हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने  कंबोजला तातडीने संघात सामील करण्यात आल्याचे जाहीर केले.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, अर्शदीप सिंग सरावादरम्यान हाताला लागलेल्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतून बाहेर पडला असून त्याला किमान दहा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आकाश दीपचीही मांडीचे स्नायू  दुखापतीची तक्रार असल्याने त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. ऐनवेळी संघनिवडीत वेगवान गोलंदाजाची कमतरता भासू नये म्हणून अंशुल कंबोजला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘इंज्युरी कव्हर’ म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. 24 वर्षीय कंबोजने यंदाच्या रणजी ट्रॉफीत केरळविरुद्ध एका सामन्यात 10 विकेट्स घेऊन विशेष कामगिरी केली होती. याशिवाय हिंदुस्थानच्या ‘अ’ संघातही त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने निवड समितीचे लक्ष वेधले होते.

कंबोजने आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना जोरदार कामगिरी केली होती. त्याच्या अचूक यॉर्कर्स आणि वेगवान बाऊन्सर्समुळे तो सध्या देशातील सर्वात संभाव्य युवा गोलंदाजांपैकी एक मानला जातो. हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रफर्ड मैदानावर रंगणार आहे. सध्या इंग्लंड ही मालिका 2-1 ने आघाडीवर असून हिंदुस्थानला मालिकेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत अंशुलला संधी मिळाल्यास त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments are closed.