पंजाबमध्ये अमली पदार्थ विरोधी कार्यकर्त्याची हत्या
कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप : आप सरकार लक्ष्य
मानसा: पंजाबच्या मानसामध्ये ड्रग्जविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची मंगळवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. परविंदर यांची हत्या पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार आणि मानसाचे आमदार विजय सिंगला यांचे समर्थनप्राप्त ड्रग्ज पेडलर्सनी केल्याचा आरोप परविंदर यांचे पिता भीम झोटा यांनी केला आहे. गोळीबाराच्या घटनेवेळी परविंदर हे सोशल मीडियावर लाइव्ह होते, यामुळे पूर्ण घटना लाइव्ह व्हिडिओत कैद झाली आहे. पंजाबमधील अमली पदार्थांच्या राजरोस विक्रीचा मुद्दा परविंदर हे उपस्थित करत होते. परविंदर हे एका फार्मसीवर गेल होते आणि तेथून मंगळवारी सकाळी ड्रग्ज विकत घेतलेल्या व्यक्तीविषयी त्यांनी फार्मसी मालकाला विचारणा केली होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला, याचदरम्यान फार्मसीमधील इसमाने झोटा यांच्यावर गोळी झाडली. गोळी शरीरातून आर-पार गेल्याने झोटा यांचा मृत्यू झाला. तर गोळीबारात 4 अन्य लोक जखमी झाले आहेत. तर या घटनेनंतर फार्मसी मालक तेथून फरार झाला. पंजाबमधील कायदा-सुव्यवस्था आणि अमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येणारया अभियानावरून काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी पंजाब सरकारवर निशाणा साधला. परविंदर सिंह यांनी पंजाबमधील अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात आवाज उठविला होता, परंतु आम आदमी पक्षाच्या सरकारने त्यांच्या प्रयत्नांना समर्थन दिले नाही असा आरोप राजा वडिंग यांनी केला आहे.
Comments are closed.