काही प्रभावकारांकडून राष्ट्रीयविरोधी पोस्ट

संसदीय समितीने मागविला कारवाईचा अहवाल

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावादरम्यान आता हिंसा भडकविणाऱ्या पोस्ट करणाऱ्या इन्फ्लुएंसर्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे. संसदेच्या एका स्थायी समितीने सोशल मीडियावर नजर ठेवणाऱ्या दोन प्रमुख मंत्रालयांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय हिताच्या विरोधात काम करणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि इन्फ्लुएंसर विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील मागविला आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालील संचार आणि माहिती-तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीने देशातील काही इन्फ्लुएंसर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देशाच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याची दखल घेतली आहे.

समितीने माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक, माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयांना पत्र लिहिले आहे. आयटी अधिनियम 2000 आणि माहिती-तंत्रज्ञान (मध्यवर्ती दिशानिर्देश आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 अंतर्गत संबंधित प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील समितीने मागविला आहे. हे पत्र दोन्ही मंत्रालयांच्या संबंधित सचिवांना पाठविण्यात आले असून त्यांना 8 मे रोजीपर्यंत तपशील उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा हितांच्या विरोधात कंटेंट पोस्ट केल्याप्रकरणी अनेक सोशल मीडिया हँडल्सवर देशात बंदी घालण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक पावले उचलली आहेत.

Comments are closed.