माजी महापौर कळमकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला, महिलेवर अत्याचार प्रकरण
तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा गुन्हा माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरोधात दाखल झाल्यानंतर गुह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात करण्यात आलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. यु. जे. मोरे यांनी फेटाळून लावला.
याबाबत शिरूर (जि. पुणे) येथील एका 25 वर्षीय विवाहित महिलेने 21 फेब्रुवारीला पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादित नमूद केल्याप्रमाणे, संबंधित महिला खासगी कामानिमित्त अहिल्यानगर येथे आली होती. सोशल मीडियावरून तिने अभिषेक कळमकर याचा मोबाईल क्रमांक मिळवून नोकरीसंदर्भात संपर्क साधला. त्यावेळी त्याने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही दिवसांनी अभिषेकने एमआयडीसी परिसरात आपली शाळा असल्याचे सांगून शाळा दाखविण्याच्या बहाण्याने तिला बोलावले. तिला एका काळ्या रंगाच्या वाहनात बसवून एमआयडीसीकडे घेऊन गेला. वाहनात तिला शीतपेय दिल्यानंतर गुंगी आल्यासारखे झाले. त्यानंतर वाहन थांबवून जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारीला शिरूर येथील लॉजवर बोलावून पुन्हा अत्याचार केल्याचे या फिर्यादित म्हटले आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून अभिषेक कळमकर फरार आहे. त्याच्या वतीने ऍड. विकास ढोकळे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. यु. जे. मोरे यांच्या समोर झाली. पीडितेचे वकील ऍड. विजय गुंदेचा यांनी अटकपूर्व जामीन देण्यास जोरदार विरोध केला. फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश मोरे यांनी हा अर्ज फेटाळून लावला आहे.
Comments are closed.