छोट्याशा श्रीलंकेने अमेरिकेला धुडकावले, दोन लढाऊ विमाने परत पाठवली; इराणविरोधात जमीन वापरू देण्यास नकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्धाचा भडका उडाला असताना श्रीलंकेसारख्या छोटय़ा देशाने ठाम भूमिका घेत अमेरिकेला धक्का दिला आहे. दोन लढाऊ विमाने श्रीलंकेत उतरवण्यासाठी अमेरिकेने परवानगी मागितली होती; मात्र श्रीलंकेने स्पष्ट शब्दांत नकार दिला. इराणवर हल्ला करण्यासाठी आमच्या भूमीचा वापर करू देणार नाही, असे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी ठणकावले.

राष्ट्रपती दिसानायके यांनी याबाबत आज संसदेत माहिती दिली. जिबूतीहून आलेल्या दोन अमेरिकी लढाऊ विमानांनी 4 आणि 8 मार्च रोजी श्रीलंकेत उतरण्याची परवानगी मागितली. मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही विमाने उतरवायची होती; मात्र दोन्ही विनंत्या नाकारण्यात आल्या, असे दिसानायके यांनी संसदेला सांगितले.

श्रीलंकेवर अनेक बाजूंनी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यानंतरही आम्ही तटस्थ भूमिका कायम ठेवली. काहीही झाले तरी आम्ही झुकणार नाही. इराणवर हल्ला करण्यासाठी आमच्या भूमीचा वापर करू देणार नाही. मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. तरीही या तणावात आम्ही पडणार नाही. आम्ही तटस्थच राहणार, असे दिसानायके यांनी स्पष्ट केले.

  • 4 मार्च रोजी अमेरिकेने श्रीलंकेच्या दक्षिणेकडील किनारपट्टीचे शहर असलेल्या गॉलजवळ इराणच्या ‘आयरीस देना’ या फ्रिगेटवर टॉर्पेडो हल्ला केला होता. या हल्ल्यात 84 खलाशी ठार झाले, तर 32 जणांना वाचवण्यात आले होते. श्रीलंकेच्या नौदलाने समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन राबवले होते.

Comments are closed.