अपाचे हेलिकॉप्टर्सने सैन्यात सामील केले
अमेरिकेहून तीन हेलिकॉप्टर्सचे भारतात आगमन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या अमेरिकेशी झालेल्या करारानुसार, अत्याधुनिक ‘अॅपॅची’ हेलिकॉप्टर्सची प्रथम खेप भारताला प्राप्त झाली आहे. अमेरिकेहून तीन हेलिकॉप्टर्स भारताला विकण्यात आली असून टप्प्याटप्प्याने हा करार पूण केला जाणार आहे. वायूदलाच्या हिंडोन येथील तळावर मंगळवारी ही हेलिकॉप्टर्स अवतीर्ण झाली. त्यांना राजस्थानातील भारत-पाकिस्तान सीमाप्रदेशात नियुक्त करण्यात येणार आहे.
ही हेलिकॉप्टर्स जगात सर्वोत्तम समजली जातात. त्यांच्या समावेशामुळे भारतीय भूदलाच्या सामर्थ्यात मोलाची वाढ होणार आहे. शत्रूच्या विरोधातील भारताची मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून त्यांचा उपयोग सीमाप्रदेशात देखरेख ठेवण्यासाठीही केला जाणार आहे. ही हेलिकॉप्टर्स अत्यंत आधुनिक अशा शस्त्रसंभाराने युक्त असून त्यांचा उपयोग बहुविध आहे, अशी माहिती दिली गेली.
समावेशासाठी काहीसा विलंब
ही हेलिकॉप्टर्स पंधरा महिन्यांपूर्वीच भारतीय भूदलात समाविष्ट होणार होती. तथापी, काही कारणांमुळे हा विलंब झाला आहे. मात्र, या पुढची हेलिकॉप्टर्स पूर्वनिर्धारित वेळेत भारताला मिळण्याची शक्यता आहे. भारत अमेरिकेकडून अशी सहा हेलिकॉप्टर्स विकत घेणार असून उरलेली तीन या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्राप्त होणार आहेत. 2020 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या प्रथम कालखंडात भारताचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात हा करार करण्यात आला होता. भारताने यापूर्वीही ही हेलिकॉप्टर्स विकत घेतली असून भारतीय वायुदलात सध्या 22 अॅपॅची नियुक्त करण्यात आली आहेत.
दोन्ही सीमांवर उपयुक्त
ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमांवर उपयुक्त आहेत. शत्रूच्या हल्ल्याची पूर्वसूचना देण्याची त्यांची क्षमता आहे. तसेच स्वयंचलित पद्धतीने शत्रूच्या पूर्वनिधारित लक्ष्यांवर ती हल्ला करु शकतात. अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे आणि अस्त्रे त्यांच्यावर स्थापित केली जाऊ शकतात. इतर हेलिकॉप्टर्सपेक्षा अधिक भार वाहून नेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची वेगळी ओळख आहे.
एएच-64 ई अॅपॅचींचे वैशिष्ट्यो
ही हेलिकॉप्टर्स वेगवान हालचालींसाठी, तसेच अचूक लक्ष्यवेधासाठी प्रसिद्ध आहेत. ती नेटवर्क सेंट्रिक, अर्थात इतर संरक्षण सामग्री, विमाने आणि इतर हेलिकॉप्टर्ससमवेत कार्य करु शकतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती कार्य करु शकतात. त्यांच्यावर अत्याधुनिक नाईट व्हिजन व्यवस्था असून कोणत्याही हवामानात ती कार्यरत राहू शकतात. ती संरक्षण आणि आक्रमण अशा दोन्ही कामांसाठी उपयोगात आणली जाऊ शकतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
वेग अन् शस्त्रसंभार
ड अॅपॅची हेलिकॉप्टर्सचा अधिकतर वेग 293 किलोमीटर प्रति तास
ड 30 एमएम चेन गन, एकावेळी 1,200 गोळ्या झाडण्याची क्षमता
ड यात 360 अंशामध्ये फिरुन नियंत्रण करणारे फायर कंट्रोल रडार
ड अत्याधुनिक देखरेख साधने, इतर अनेक मारक शस्त्रास्त्रांनी युक्त
Comments are closed.