पश्चिम बंगालच्या विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती रद्द
ममता बॅनर्जी गटाच्या याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय : अध्यक्षांना 10 दिवसांची मुदत
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादात कलकत्ता उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष रतिंद्र बोस यांचा आदेश रद्द करत ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून केलेली नियुक्ती अयोग्य ठरवली. उच्च न्यायालयाने अध्यक्षांना दोन्ही पक्षांच्या दाव्यांवर पुनर्विचार करून 10 दिवसांच्या आत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे ज्येष्ठ नेते सोभनदेव चट्टोपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय आला आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी 3 जून रोजी ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि अख्रुझमान यांची मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्ती रद्द केली. तसेच न्यायालयाने अध्यक्षांचा आदेश सदोष असल्याचे घोषित केले. उच्च न्यायालयाने अध्यक्षांना कायद्यातील तरतुदींनुसार, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत दोन्ही नियुक्त्यांवर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अध्यक्षांना आता या पदांवरील नियुक्त्यांबाबत नव्याने निर्णय घ्यावा लागेल.
ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नियुक्तीला आव्हान
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून तृणमूल काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. पक्षाने या पदासाठी सोभनदेव चट्टोपाध्याय यांची निवड केली होती. 9 मे रोजी अध्यक्षांना याची माहिती दिली होती. मात्र, पक्षात फूट पडल्यानंतर बंडखोर गटाने ऋतब्रत बॅनर्जी यांचे नाव सुचवले. सभापती रतिंद्र बोस यांनी 3 जून रोजी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली. याविरोधात सोभनदेव चट्टोपाध्याय यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सभापती दोन्ही पक्षांच्या दाव्यांवर पुनर्विचार करणार
कलकत्ता उच्च न्यायालयाने सभापतींचा पूर्वीचा आदेश रद्द केला असून, दोन्ही पक्षांचे दावे आणि त्यांच्याशी संबंधित कागदपत्रांवर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर 10 दिवसांच्या आत निर्णय दिला जाईल. या निर्णयानंतर, सभापती विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कोणाला मान्यता देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. तूर्तास ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून असलेली मान्यता आता संपुष्टात आली आहे. मात्र, हे पद कोणाला दिले जाईल हे न्यायालयाने ठरवले नाही. हा निर्णय आता सभापतींना नव्याने घ्यावा लागेल. पुढील 10 दिवस या प्रकरणात निर्णायक असून सभापतींच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Comments are closed.