शुबन्सूचे कौतुक, किल्ल्यांचे महत्त्व

‘मन की बात’च्या 124 व्या भागात पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे रवारी देशवासियांना संबोधित केले. 124 व्या भागात पंतप्रधान मोदींनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करताना देश आणि समाजाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या लोकांच्या योगदानाचेही कौतुक केले.

‘मन की बात’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशू शुक्लाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, शुभांशू शुक्लाच्या अंतराळातून परतण्याबद्दल देशात बरीच चर्चा झाली. संपूर्ण देश अभिमानाने भरून गेला. शुभांशूच्या या कार्याची प्रेरणा घेत भविष्यात देशातील अनेक विद्यार्थी अंतराळ क्षेत्राची निवड करत देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला. ऑगस्ट 2023 मध्ये चांद्रयान-3 च्या यशाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात एक नवीन वातावरण निर्माण झाले आहे. विज्ञान आणि अवकाशाबद्दल मुलांमध्येही एक नवीन उत्सुकता जागृत झाली आहे. आता लहान मुलेही अवकाशाबद्दल बोलतात. त्यांच्या अवकाश शास्त्रज्ञ बनण्याबद्दल आकर्षण असल्याचे दिसते, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना ‘इन्स्पायर मानक’ मोहिमेबद्दल माहिती दिली. ही मोहीम मुलांमध्ये नवोपक्रमाला चालना देण्यासाठी आहे. यामध्ये प्रत्येक शाळेतून 5 मुले निवडली जातात. प्रत्येक मूल एक नवीन कल्पना घेऊन येते. आतापर्यंत लाखो मुले यात सामील झाली आहेत. चांद्रयान-3 नंतर त्यांची संख्या दुप्पट झाली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

शिवरायांचे किल्ले बनले जागतिक वारसा!

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी जागतिक वारसास्थळांबद्दलही भाष्य केले. छत्रपती शिवरायांच्या काळात बांधले गेलेले 12 किल्ले युनेस्कोने अलिकडेच जागतिक वारसा म्हणून जाहीर पेले आहेत. ही बातमी आपल्या सर्वांना अभिमानाने भरून टाकते. देशाच्या इतर भागातही असे अद्भुत किल्ले आणि रचना आहेत. चित्तोडगड किल्ला, कुंभलगड किल्ला, रणथंभोर किल्ला, आमेर किल्ला आणि राजस्थानचा जैसलमेर किल्ला जगप्रसिद्ध आहेत. कर्नाटकातील गुलबर्गा किल्ला देखील खूप मोठा आहे. चित्रदुर्ग किल्ल्याची विशालता देखील कुतूहलाने भरून टाकते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

हातमाग स्टार्टअप्सबद्दल माहिती

पंतप्रधानांनी हातमाग स्टार्टअप्सबद्दलही माहिती दिली. ‘वस्त्राsद्योग क्षेत्र हे आपल्या सांस्कृतिक विविधतेचे एक उदाहरण आहे. आज कापड आणि वस्त्राsद्योग बाजारपेठ खूप वेगाने वाढत आहे. या विकासाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे खेड्यांतील महिला, शहरातील डिझायनर्स, वृद्ध विणकर आणि आपले तरुण स्टार्टअप सुरू करणारे हे सर्वजण एकत्रितपणे पुढे नेत आहेत. आज भारतात 3000 हून अधिक कापड स्टार्टअप आहेत. अनेकांनी भारताच्या हातमागाच्या ओळखीला जागतिक मान्यता दिली आहे’, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

लोकगीतांच्या योगदानाचेही कौतुक

भारताच्या विविध संस्कृतीचा उल्लेख करताना, पंतप्रधान मोदींनी पर्यावरण संरक्षणात लोकगीतांच्या योगदानाचेही कौतुक केले. भारताच्या विविधतेची सर्वात सुंदर झलक आपल्या लोकगीते आणि परंपरांमध्ये आढळते. भजन आणि कीर्तन याचाच एक भाग आहेत. ओडिशात राधाकृष्ण संकीर्तन मंडळाच्या माध्यमातून पारंपरिक गाण्यांद्वारे जंगलातील आगींबद्दल जागरूकता पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी पारंपरिक गाण्यांमध्ये नवीन गीते आणि नवीन संदेश जोडले, असे उदाहरण पंतप्रधानांनी दिले.

पक्षी गणनेत ‘एआय’चा वापर

पक्षी गणनेत ‘एआय’चा वापर हा विशेष होता. आसामच्या प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात एक अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. काझीरंगा येथे प्रथमच गवताळ प्रदेशातील पक्षी गणना करण्यात आली. या गणनेत 40 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती ओळखल्या गेल्या, ज्यात अनेक दुर्मिळ पक्षी देखील समाविष्ट आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सर्व शक्य झाले. टीमने ध्वनी रेकॉर्डिंग उपकरणे बसवल्यानंतर एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) तंत्रज्ञानाद्वारे त्या आवाजांचे संगणकावर विश्लेषण केले गेले. या प्रक्रियेत, पक्ष्यांना त्रास न देता केवळ त्यांच्या आवाजाने ओळखले गेले. जेव्हा तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता एकत्र येतात तेव्हा निसर्ग समजून घेणे आणखी सोपे होते, हेच यातून दिसून येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आगामी उत्सवांसाठी देशवासियांना शुभेच्छा

कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आगामी उत्सवांसाठी शुभेच्छा दिल्या. आता श्रावणोत्सवाला प्रारंभ झाला असून नागपंचमी आणि रक्षाबंधनानंतर जन्माष्टमीही येणार आहे. हे सर्व सण आपल्या भावनांशी जोडलेले आहेत. हे सण आपल्याला निसर्गाशी असलेले नाते आणि संतुलनाचा संदेश देखील देतात. या पवित्र सणांच्या सर्वांना शुभेच्छा देत पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या 124 व्या भागाचा समारोप केला.

Comments are closed.