सोलापूरकरवर कारवाई होणार – फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल योग्य ती कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना जनभावनेचा विचार करूनच बोलले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘हिंदू गर्जना चषक’ कुस्ती स्पर्धेला फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, लोकांच्या भावना दुखावतील, असे इतिहासाचे वर्णन, विकृतीकरण कुणाच्याही हाताने होऊ नये. सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. मात्र, योग्य ती कारवाई होईल.

दिल्ली निवडणुकीच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. भाजपच्या विजयासह खोटे राजकारण चालणार नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले. केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा हात पकडून त्यांच्या आंदोलनातून राजकारण सुरू केले. पण नंतर ते भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले. त्याला दिल्लीच्या जनतेने उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या प्रश्नाबाबत फडणवीस म्हणाले, दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही

Comments are closed.