जम्मू-काश्मीरच्या स्टार गोलंदाजाची कमाल; 92 वर्षांच्या रणजी इतिहासात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ जिंकणारा फक्त तिसरा गोलंदाज

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी ट्राॅफीच्या चालू हंगामातील अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यात हुबळी येथे पार पडला. या लढतीत जम्मू-काश्मीर संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये वर्चस्व गाजवत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इतिहास रचला. प्रथमच रणजी ट्राॅफी जिंकत संघाने ६७ वर्षांची प्रतीक्षा संपवली.

या ऐतिहासिक यशात २९ वर्षीय वेगवान गोलंदाज औकिब नबी याची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या कामगिरीची सातत्याने चर्चा होती. त्याने १० सामन्यांत १२.५७ च्या सरासरीने तब्बल ६० बळी घेतले. एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम त्याने तब्बल सात वेळा केला. अंतिम सामन्यातही कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात त्याने पाच बळी घेत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल औकिब नबी याला ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ POTS पुरस्काराने गौरविण्यात आले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका हंगामात ६० किंवा त्याहून अधिक बळी घेणारे तो फक्त तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि धारदार गोलंदाजीमुळे जम्मू-काश्मीरला निर्णायक क्षणी मोठा फायदा झाला.

पुरस्कार स्वीकारताना औकिब नबी भावूक झाला. “आम्ही रणजी ट्राॅफी जिंकली, यावर अजूनही विश्वास बसत नाही. हे स्वप्नवत वाटत आहे. जम्मू-काश्मीरकडून खेळायला सुरुवात केली तेव्हापासून रणजी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागला. संपूर्ण संघाने एकजुटीने खेळ केल्यामुळे हे शक्य झाले,” असे त्याने सांगितले.

पुढे तो म्हणाला, “माझी योजना नेहमी सोपी असते, प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणे. संघाला ज्या क्षणी जे हवे असेल, ते देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो. सर्वांनी मला मोठा पाठिंबा दिला. त्याच्या साथीतच आज इथपर्यंत पोहोचलो. जम्मू-काश्मीरच्या जनतेचेही मी मनापासून आभार मानतो. सुविधा कमी असल्या तरी कठोर परिश्रम आणि चिकाटी असेल, तर यश नक्की मिळते.”

Comments are closed.