अर्जुन तेंडुलकर–सानिया चंडोक विवाहबद्ध; मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला ग्रँड लग्नसोहळा

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात आनंदी वातावरण आहे. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सानिया चांडोकसोबत नवीन आयुष्य सुरू केले आहे. मुंबईतील वरळी परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला. कुटुंब, मित्र आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून या लग्न सोहळ्याचे विविध विधी सुरू होते. हळदी आणि मेहंदीचे समारंभ उत्साहात पार पडले. त्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अखेर आज सकाळी १२:४५ वाजता अर्जुन आणि सानियाने एकमेकांना हार घालून सात जन्मांची गाठ बांधली.

या खास दिवशी सानिया चांडोक लाल रंगाच्या पारंपारिक साडीत खूपच सुंदर दिसत होती. दुसरीकडे, अर्जुन तेंडुलकरने लाल शेरवानी घालून पारंपारिक लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लग्न समारंभात, अंजली तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर दोघेही त्यांच्या मुलाच्या या खास क्षणाचे आनंदी साक्षीदार होते. सचिनने शेरवानी घातली होती, तर अंजलीने गुलाबी साडी घातली होती.

लग्न समारंभानंतर नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्या क्षणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. चाहते आणि नेटकऱ्यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

या समारंभाला क्रिकेट, बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे, अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सुनील गावस्कर, शंकर महादेवन, फरहान अख्तर, युवराज सिंग, झहीर खान, एमएस धोनी, आशिष नेहरा, श्रेयस अय्यर आणि इरफान पठाण असे दिग्गज होते. बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनीही उपस्थित राहून या सोहळ्याला शोभा आणली.

Comments are closed.