मैदानात अर्जुन-वैभवचं वादळ! लग्नाआधी अर्जुन तेंडुलकरचा जुना फॉर्म परतला

अर्जुन तेंडुलकर लवकरच त्याची मैत्रीण सानिया चंधोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच दोन्ही कुटुंबांनी अंबानी कुटुंबासोबत जामनगर येथील फार्म हाऊसवर ‘प्री-वेडिंग’ सोहळा साजरा केला. या सेलिब्रेशननंतर लगेचच अर्जुन आयपीएल २०२६ च्या तयारीसाठी ‘डीवाय पाटील टी-२० कप २०२६’ मध्ये खेळण्यासाठी पोहोचला. तिथे त्याने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी सोबत मिळून आपल्या संघासाठी धावांचा पाऊस पाडला. अर्जुनने अत्यंत धडाकेबाज शैलीत आपले अर्धशतक पूर्ण केले.

​वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघेही ‘डीवाय पाटील टी-२० कप २०२६’ मध्ये ‘डीवाय पाटील ब्लू’ संघाकडून खेळत आहेत. या दोन्ही खेळाडूंनी मिळून अवघ्या ४८ चेंडूंमध्ये ११८ धावा कुटल्या. २५ फेब्रुवारी रोजी या दोन्ही युवा खेळाडूंच्या संघाचा सामना ‘इंडियन नेव्ही’ संघाविरुद्ध झाला. जिथे वैभवने १९ चेंडूंमध्ये ६३ धावांची वादळी खेळी केली. त्याने ३३१.५८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ७ चौकार आणि ५ षटकार ठोकले. याच सामन्यात ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने २९ चेंडूंत नाबाद ५५ धावांची शानदार खेळी केली. अर्जुनने १८९.६६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ७ चौकार आणि २ उत्तुंग षटकार लगावले. अर्जुनने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

​आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी अर्जुन तेंडुलकर आपली मंगेतर सानिया चंडोकसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यानंतर तो आयपीएलच्या १९ व्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळताना दिसेल. या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला लखनौ सुपर जायंट्ससोबत ‘ट्रेड’ केले होते. अशा परिस्थितीत अर्जुनला या हंगामात स्वतःला सिद्ध करून ‘प्लेइंग ११’ मध्ये आपली जागा निश्चित करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात अर्जुनने गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली, ज्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (सामनावीर) म्हणून गौरवण्यात आले.

Comments are closed.