दीर्घ संघर्षासाठी सशस्त्र सैन्याने तयार केले पाहिजे
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य : पाकिस्तानसोबतच्या तणावाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ महू
अनपेक्षित भू-राजकीय परिस्थिती पाहता देशाच्या सशस्त्र दलांना अल्पकालीन संघर्षांपासून 5 वर्षांपर्यंतच्या युद्धासह सर्वप्रकारच्या सुरक्षा आव्हानांसाठी तयार रहावे लागेल असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी काढले आहेत. महू येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये तिन्ही संरक्षण दलांच्या ‘रण संवाद 2025’च्या दुसऱ्या आणि अंतिम दिनाच्या पूर्ण सत्राला संबोधित करताना राजनाथ यांनी भारत कुणाचा भूभाग इच्छित नाही, परंतु स्वत:च्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
सद्यकाळात युद्ध इतके अचानक आणि अनपेक्षित झाले आहे की कुठले युद्ध कधी समाप्त होईल आणि किती काळ चालेल याचा अनुमान लावणे अत्यंत अवघड आहे. भारतीय सशस्त्र दलांना सर्वप्रकारच्या स्थितीसाठी तयार रहावे लागणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे. जर एखादे युद्ध दोन महिने, चार महिने, एक वर्ष, दोन वर्षे एवढेच नाही तर 5 वर्षांपर्यंत चालल्यास त्याकरता आम्हाला पूर्णपणे तयार रहावे लागणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा आता केवळ सैन्यापुरती विषय मर्यादित राहिलेला नाही. तर हा संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टीकोनाचा मुद्दा ठरला असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
आम्हाला कुणाचा भूभाग नको, परंतु आम्ही आमच्या भूमीच्या रक्षणासाठी काहीही करण्यास तयार आहोत असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. संरक्षण मंत्र्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, वायुदलप्रमुख ए. पी. सिंह आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्यासह भारताच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांना संबोधित केले आहे.
तिन्ही संरक्षण दलांचे कौतुक
राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’साठी तिन्ही संरक्षण दलांचे कौतुक केले आणि हे अभियान भारताच्या स्वदेशी उपकरणे आणि शस्त्रास्त्रप्रणालींच्या यशाचे एक उत्तम उदाहरण म्हणून समोर आल्याचा दावा केला. या अभियानाच्या कामगिरीने पुन्हा एकदा आगामी काळात आत्मनिर्भरता एक परम आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले आहे. आम्ही आत्मनिर्भरतेच्या मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे, परंतु आम्हाला अद्याप अजून मोठा पल्ला गाठायचा असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
ऑपरेशन सिंडुर्चा उल्लेख
ऑपरेशन सिंदूरचे यश भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि चपळतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अशाप्रकारच्या अभियानाची पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती. ऑपरेशन सिंदूर हे तंत्रज्ञान-संचालित युद्धाचे एक अद्भूत प्रदर्शन होते असे वक्तव्य राजनाथ यांनी केले आहे. रणसंवाद 2025 मध्ये तिन्ही संरक्षण दलांच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण क्षेत्राच्या वर्तमान आणि भावी आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठीच्या उपायांवर मंथन केले आहे.
Comments are closed.