सैन्य अधिकाऱ्याकडून विमान कर्मचाऱ्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, कंपनीचे मंत्रालयास पत्र; व्हिडिओ

नवी दिल्ली : श्रीनगर येथून दिल्लीकडे रवाना होत असलेल्या स्पाइसजेट विमान प्रवासातील एका प्रवाशाने विमान कंपनीच्या चार कर्मचाऱ्याना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 जुलै रोजी श्रीनगर एअरपोर्टवर (Airport) घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण करणारी व्यक्ती सैन्य दलात अधिकारी (Indian army) असल्याची माहिती आहे. स्पाईसजेटच्या उडान SG-386 विमानच्या बोर्डिंग गेटवर स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने गोंधळ उडाला होता. एअरलाईन कंपनीने अधिकृत माहिती देत, या मारहाणीत चारही कर्मचारी जखमी झाले असून एकाच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचंही त्यांनी म्हटंलय. दरम्यान, याप्रकरणी संबंधित अधिकारी प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पाईसजेट एअरलाईनच्या माहितीनुसार, हल्ला करणारी व्यक्ती भारतीय सैन्य दलात अधिकारी असून त्यांचे नाव सार्वजनिक करण्यात आले नाही. मात्र, या अधिकाऱ्याने विमानतळावरील कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी, एक कर्मचारी बेशुद्ध पडला होता, तरीही संबंधित व्यक्तीकडून मारहाण करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर, एका कर्मचाऱ्याला तोंडावर जबर मारहाण झाली असून त्याच्या नाका-तोंडातून रक्त बाहेर आले आहे. सध्या सर्वच जखमी कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्लीकडे जाणाऱ्या विमानातील संबंधित प्रवासी हे वरिष्ठ सैन्य अधिकारी आहेत. ते आपल्या प्रवासात दोन केबिन लगेच घेऊन जात होते, ज्याचे वजन एकूण 16 किलो होते. मात्र, विमान प्रवासात केवळ 7 किलो वजनाचे सामान नेण्याची परवानगी आहे. त्यामुळे, संबंधित प्रवाशाकडील लगेजचे वजन हे निर्धारीत वजनाच्या दुप्पटहून अधिक होते. त्यामुळे, विमान कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला अधिकच्या सामानाची, वजनाची माहिती दिली. तसेच, अतिरिक्त सामानाचे अतिरीक्त शुल्क देण्याची विनंती केली. त्यावरुन, संबंधित प्रवाशाने संताप व्यक्त केला. त्यावेळी, त्यांनी बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी एअरोब्रिजमध्ये प्रवेशही केला. विमान सुरक्षा प्रोटोकॉलचे ते उल्लंघन आहे. दरम्यान, या घटनेनंतर सीआयएसएफच्या अधिकाऱ्याने प्रवाशी अधिकाऱ्यास वापस गेटवर पोहोचवले. मात्र, गेटवर पोहोचल्यानंतर सैन्य अधिकाऱ्याचा संताप अनावर झाला आणि त्यांच्याकडून स्टाफमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली, असे कंपनीने अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

सैन्य अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित प्रवाशी सैन्य अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्यांना नो फ्लाई प्रवासी यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. तसेच, कंपनीने विमान नागरी उड्डाण मंत्रालयास देखील संबंधित घटनेची पत्राद्वारे माहिती दिली आहे.

हेही वाचा

पवार घराण्याची सून तनिष्का कुलकर्णी कोण? युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न, कुटुंब पुन्हा एकत्र

आणखी वाचा

Comments are closed.