बांगलादेश सीमेवर लष्कराने 3 नवीन चौक्या उभारल्या आहेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेश आणि पाकिस्तानात अलिकडेच वाढलेली मैत्री आणि बदलत्या स्थितीदरम्यान भारताने बांगलादेश सीमेवर तीन नव्या सैन्य चौक्या (गॅरिसन) स्थापन केल्या आहेत. या चौक्या बमुनी (धुबरीनजीक), किशनगंज आणि चोपडा येथे आहेत. याचा उद्देश सीमेवर कमजोर ठिकाणांना मजबूतकरणे, देखरेख वाढविणे आणि सिलिगुडी कॉरिडॉरचे रक्षण करणे आहे. सिलिगुडी कॉरिडॉरलाच ‘चिकन नेक’ म्हटले जाते, हा कॉरिडॉर ईशान्येच्या राज्यांना उर्वरित देशांशी भूमार्गाने जोडतो. हा केवळ 22 किलोमीटर रुंदीचा असून नेपाळ, बांगलादेश, चीन आणि भूतानच्या सीमांनी वेढलेला आहे.
अलिकडेच बांगलादे
शचे अंतरिम सल्लागार मुहम्मद युनूस यांनी पाकिस्तानचे जनरल साहिद शमशाद मिर्झा यांची भेट घेत संपर्कव्यवस्था आणि संरक्षण संबंधांवर चर्चा केली होती. शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून पायउतार उतार व्हावे लागल्यावर युनूस यांनी पाकिस्तान आणि चीनशी जवळीक केल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत. बांगलादेशच्या माध्यमातून पाकिस्तान सिलिगुडी कॉरिडॉरला लक्ष्य करू शकतो असे गुप्तचर यंत्रणांचे सांगणे आहे. परंतु भारतीय सैन्यानुसार चिकन नेक कमजोर नव्हे तर देशाचा सर्वात मजबूत भूभाग आहे.
भारताची सतर्कता
शेख हसीना यांना बांगलादेशातून पलायन करावे लागल्यावर मुहम्मद युनूस हे अंतरिम प्रमुख झाले आहेत. त्यांनी बांगलादेशची धोरणे बदलली आहेत. चीनच्या गोटात ते शिरले असून पाकिस्तानसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. भारत या सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहे. नव्या चौक्या इंटेलिजेन्स, लॉजिस्टिक्स आणि जलद प्रतिक्रियेसाठी आहेत, या चौक्या सैन्याला लवकर पावले उचलण्यास मदत करणार आहेत असे गुप्तचर स्रोतांचे सांगणे आहे.
त्रिशक्ती कोर: चिकन्नेकचा मुख्य रक्षक
भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोरचे (33 कोर) सिलिगुडी कॉरिडॉरनजीक सुखना येथे मुख्यालय आहे. या कोरने सैनिक आणि शस्त्रास्त्रांची मजबूत उपस्थिती ठेवली आहे. अलिकडेच टी-90 रणगाड्यांसोबत लाइव्ह फायरिंग सराव करण्यात आला आहे. भारताने चिकन नेकला स्टेट-ऑफ-द-आर्ट तंत्रज्ञानाने पूर्णपणे सुरक्षित केले आहे. येथे तैनात मुख्य शस्त्रासांमध्ये राफेल लढाऊ विमान सामील असून पश्चिम बंगालच्या हाशिमारा वायुतळावर 18 लढाऊ विमाने आहेत. सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये एस-400 हवाई यंत्रणेची दुसरी रेजिमेंट तैनात आहे. ही यंत्रणा हवाईक्षेत्राला पूर्णपणे अभेद्य करते. आकाश हवाई सुरक्षा यंत्रणाही येथे तैनात करण्यात आल्याचे समजते.
Comments are closed.